LIVE Marathi News Updates : शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण I Marathi Breaking News Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

esakal Breaking News

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण

मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

राज्यात 450 नवीन कोरोना रुग्ण

मागच्या २४ तासांमध्ये राज्यामध्ये ४५० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

भारत 40 हजार कोटी रुपयांचे संरक्षण उपकरणे निर्यात करणार

2026 पर्यंत भारत 35,000 ते 40,000 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे आणि साहित्य निर्यात करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे.

तक्रार करण्यासाठी सुषमा अंधारे परळी पोलिस ठाण्यात

संजय सिरसाट यांनी केलेल्या विधानाविरोधात तक्रार करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे परळी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

मुश्रीफांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्ट ५ एप्रिलला याबाबत निर्णय देणार आहे.

मंत्रालयाबाहेर विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा मृत्यू

मंत्रालयाबाहेर दोन महिलांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

60 यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली

केरळ : तामिळनाडूतील सुमारे 60 सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस पठानमथिट्टा जिल्ह्यातील खोल दरीत कोसळल्यामुळं अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मक्केला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू

रमजानच्या पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियात उमराह करण्यासाठी गेलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 20 मुस्लिम बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस डोंगराळ भागातून जात असताना ब्रेक फेल झाल्याने पुलावर आदळली आणि बसला आग लागली. 

जपानची धरती भूकंपानं हादरली, 1448 तासांनी 6.1 तीव्रतेचा भूकंप

जपानमध्ये 1448 तासांनी 6.1 तीव्रतेचा भूकंप झाला झाल्याची माहिती मिळत आहे. याआधी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताला भूकंपाचा धक्का बसला आहे.

PAN-Aadhaar लिंक करण्याची तारीख 30 जून पर्यंत वाढवली

करदात्यांना आणखी काही वेळ देण्यासाठी PAN आणि Aadhaar लिंक करण्याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दिल्ली हायकोर्टाचे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स

राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली हायकोर्टानं संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावलं आहे. कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. 

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद रद्द

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आलीये. डॉ. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळं ही सनद रद्द करण्यात आली आहे. वकिली करताना त्यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे.

शरजील इमामसह 9 आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा झटका

दिल्लीतील 2019 च्या जामिया हिंसाचार प्रकरणात शरजील इमामसह 9 आरोपींना उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसलाय. कनिष्ठ न्यायालयानं एकूण 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता उच्च न्यायालयानं 9 आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींना दोषमुक्त करण्याच्या आदेशाला दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं.

उमेश अपहरण प्रकरण : अतिकसह तीन आरोपी दोषी, अश्रफसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता

उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणी न्यायालयानं अतिकसह तीन आरोपींना दोषी ठरवलं आहे. तर, अश्रफसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लवकरच शिक्षा जाहीर केली जाणार आहे.

राहुल गांधींनी माफी न मागितल्यास एफआयआर दाखल करू - रणजित सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ‘सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास’ त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ‘राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास मी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करेन’, असे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी सांगितले.

राज्यातील 257 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 30 एप्रिलला

राज्यातील 257 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या  निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. येत्या 30 एप्रिलला बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी सोबत लढणार आहे.

288 मतदारसंघांत सावरकर गौरव यात्रा काढणार - चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या वतीनं सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्व नेते, पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अतिक अहमदला मोठा झटका, सुरक्षेच्या मागणीला SC चा साफ नकार

अतिक अहमदनं सर्वोच्च न्यायालयात त्याला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती. न्यायालयानं याला स्पष्ट नकार दिला. न्यायालयानं अतिकला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात काल तपासणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट झालं आहे. 

देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर बॉम्ब? कंट्रोल रूमला धमकीचा फोन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरासमोर बाँब ठेवल्याचा फोन आला आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूममधून हा फोन आला होता. रात्री 2 च्या सुमारास हा फोन आला. त्यामुळं फडणवीसांच्या घरी रात्री बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस सुरक्षा वाढविली होती. फोन करणारा व्यक्ती हा कन्हान भागातील राहणारा असून घरची वीज गेली म्हणून रागात बॉम्ब ठेवल्याचा फोन केल्याची माहिती त्यानं दिली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भगतसिंह कोश्यारींना हायकोर्टाचा मोठा दिलासा

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू कोश्यारी यांचा नव्हता, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं केली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निर्ढावलेल्या, मग्रूर मंत्र्याचा राजीनामा घ्या; संभाजीराजेंची मागणी

छत्रपती संभाजी राजे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी आक्रमक ट्विट केले आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रातील भोंगळ व्यवस्थेचा छत्रपती संभाजी राजे यांनी पर्दाफाश केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत स्वत:च्या मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरी देखील परिस्थिती जैसे थे आहे. इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ खासदारांचे दिल्लीत आंदोलन

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा दिल्लीतील संसदेच्या आवारात राज्यातील भाजप-शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन करत निषेध केला. ‘बंद करो-बंद करो, वीर सावरकरजी का अपमान बंद करो’ अशा आशयाचे फलक झळकावत खासदारांनी राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात घोषणाबाजी केली.

हरभरा खरेदीत हिंगणघाटच्या व्यापाऱ्याची 24 लाखांची फसवणूक

हरभरा खरेदीत एका व्यापाऱ्याची तब्बल 24 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली. अकोल्यातील दलालाने हिंगणघाटच्या व्यापाऱ्याला गंडा घातला आहे. हरभरा खरेदी केल्यानंतर खरेदीची 24 लाख रुपयांची रक्कम दिली नसल्यानं व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली.  या प्रकरणी अकोला येथील दलाल मनीष जैन याला अटक केली आहे.

मुंबई-पुणे प्रवास महागणार; टोल दरांत मोठी वाढ

नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी महागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलच्या किंमतीत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे.

ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगायचा प्रयत्न करू नये - संजय राऊत

'सावरकर विरुद्ध गांधी' असे राजकारण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. 'मी सावरकर नाही, मी गांधी आहे' या राहुल गांधींच्या वक्तव्यावर शिंदे-फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 'महाविकास आघाडी'तील प्रमुख घटक पक्षाचे उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका झाली. राहुल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या कारवाईबाबत काँग्रेस लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, तर दुसरीकडे भाजपने सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि संघ परिवराचा काहीही सबंध नव्हता. संघ परिवाराने सावरकरांना काय शत्रू मानले होते तसेच त्यांना वाळीत टाकले होते. मुख्यमंत्री वीर सावरकरांवर काही बोलू शकत नाहीत. ते एका कागदावर लिहून दिलेले वाचून दाखवतात. सत्ताधारी अडानी बचाव यात्रा काढत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगायचा प्रयत्न करू नये, असे देखील राऊत म्हणाले. 

अमेरिकेच्या शाळेत महिलेचा अंदाधुंद गोळीबार, 3 विद्यार्थ्यांसह 6 जणांचा मृत्यू

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीय. आता गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या टेनेसी येथील नॅशविले शहरातील ख्रिश्चन शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात हल्लेखोर महिलेने 3 शाळकरी मुलांसह 6 जणांची हत्या केली आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर महिलेचा मृत्यू झाला आहे.

रेवदंडा खाडीवरील पूल अवजड वाहनांसाठी बंद

अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांना जोडणारा रेवदंडा खाडीवरील पूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल नादुरुस्त झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

कांद्यासाठी ३५० रु. अनुदान फक्त २०० क्विंटलपर्यंतच; शासन आदेश जाहीर

कांद्याचे दर पडल्यामुळे शासनाने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याबाबतचा शासन आदेश आज काढला आहे. त्यामध्ये प्रति शेतकऱ्याने २०० क्विंटलपर्यंत, विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळणार आहे. एक फेब्रुवारी ते ३१ मार्च कालावधीत विकलेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आयडीबीआय बँकेत भीषण आग

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरातील पाबळरोड येथील आयडीबीआय बँकेत आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील कागदपत्रांसह साहित्य जळून खाक झालं असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

देशात 134 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 10 हजार पार

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावताना दिसतेय. देशात तब्बल 134 दिवसांनंतर कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येने 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1,805 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.19 टक्के तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.39 टक्के इतका आहे.

क्रूरतेचा कळस! आईनं पोटच्या पोरीची चाकू खुपसून केली निर्घृण हत्या

आईनं चार वर्षीय पोटच्या पोरीची चाकू खुपसून निर्घृण हत्या केलीये. पुण्यातील हडपसर भागात काल रात्री ही धक्कादायक घटना घडली. वैष्णवी महेश वाडेर (४) असं या चिमुरडीचं नाव आहे. या संबंधी या लहान मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र, नेमकं तिनं ही हत्या कुठल्या उद्देशानं केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नाटू नाटू गाण्याचे संगीतकार किरवाणी यांना कोरोनाची लागण

 प्रसिद्ध  संगीतकार एमएम किरवाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी  मुलाखतीमध्ये त्यांच्या हेल्थची अपडेट चाहत्यांना दिली. ही मुलखत किरवाणी यांनी ऑनलाईन दिली. 

Latest Marathi News : निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. काल माजी मुख्यमंत्री बीएस युडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक झालीये. शिवाय, महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. तसेच आज मुंबईत G-20 परिषद होत आहे. त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आतिक अहमद प्रकरणही चांगलंच गाजतंय. शिवाय, देशभरातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.