
Pankaja Munde : काहीच न मिळाल्यास ऊस तोडायला जाऊ - पंकजा मुंडे
नवी दिल्ली : भाजपच्या राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. आपल्याला पदाची लालसा नसून काही न मिळाल्यास आपण ऊस तोडायला शेतात जाऊ, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी कुणाचे नाव घेऊन टीका केली नाही; परंतु मागील पाच वर्षांपासून त्यांना भाजपातील राजकारणात बाजूला केल्याची खंत मात्र त्या लपवू शकल्या नाहीत.
‘‘आपल्याला राजकारणात आता काही मिळण्याची लालसा राहिलेली नाही. समाजातील अखेरच्या व्यक्तीच्या विकासासाठी काम करीत राहण्याचा सल्ला गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्याप्रमाणे आपली पुढील राजकीय वाटचाल राहणार आहे. राजकारणात काहीच राहिले नाही तर ऊस तोडायला शेतात जायची आपली तयारी आहे,’’ असे त्या म्हणाल्या.
धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी आपले जीवन वेचले, हेच ध्येय प्रत्येक नेत्याने ठेवण्याची आवश्यकता आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री