महाराष्ट्राला रस्ते प्रकल्पांत केंद्राकडून भरघोस मदत

roads
roads

नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने देशभरात हाती घेतलेल्या रस्तेबांधणी प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राच्या पदरात भरभरून माप पडले आहे. देशात सध्या 55 हजार 921 किलोमीटर लांबीचे व किमान चार लाख 33 हजार कोटी रुपयांचे जे 1475 रस्ते प्रकल्प सुरू आहेत, त्यातील महाराष्ट्रात सर्वाधिक; म्हणजे 3320.38 किलोमीटरच्या व सुमारे 27 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. देश व राज्यातील सर्वच भागांत; विशेषतः ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे कालमर्यादेत बळकट करण्याकडे गडकरींचा विशेष कल असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले.

देशात सध्या रस्तेबांधणीचा वेग दरदिवशी 26 किलोमीटर असून यात 2017-18 या एकाच वर्षांत तब्बल 21 हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्धार गडकरींचे मंत्रालय वेगाने पूर्ण करत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा विक्रम मानला जातो. "सकाळ'ला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार देशभरात हजारो कोटींचे रस्तेबांधणी प्रकल्प सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.24 चे विद्युतवेगाने चाललेले काम तर दिल्लीकर डोळ्यांनी पाहात आहेत. कितीही रात्र झाली तरी पुद्दुचेरी व त्रिपुरापासून दिल्ली व मुंबईपर्यंतच्या रस्त्यांचा अहवाल आपल्याला मिळालाच पाहिजे, असा दंडक त्यांनी घातला आहे. केवळ राष्ट्रीय माहमार्गांचे उदाहरण घेतले तरी देशभरात जी कामे सुरू आहेत त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक व मेघालयात सर्वांत कमी (12 किलोमीटर) रस्त्यांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्राच्या खालोखाल मध्य प्रदेश (7678 किलोमीटर), पश्‍चिम बंगाल (5904 किलोमीटर) व उत्तर प्रदेश (5898 किलोमीटर) या राज्यांतील रस्ते कामांचे प्रमाण जास्त आहे.

काही कारणांनी रेंगाळलेल्या प्रकल्पांतही महाराष्ट्रातील सर्वांत कमी, म्हणजे केवळ एका प्रकल्पाचा समावेश आहे. जे 358 किलोमीटरचे प्रकल्प संथ गतीने चालले आहेत त्यांत उत्तराखंड (17), राजस्थान (15) आसाम (14) व मध्य प्रदेश (12) या राज्यांतील जास्त प्रकल्प आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्वाधिक 103 प्रकल्प रखडले आहेत. केंद्राकडून मिळालेला निधी राज्ये खर्च करत नाहीत, हा समजही महाराष्ट्राने खोटा ठरविला असून, राज्याने सर्वाधिक निधी खर्च केला आहे. 2014-15 या वर्षात तर केंद्राकडून 431 कोटी 20 लाख रुपये मिळाले असताना राज्याने 423 कोटींचा खर्च केला आहे. गतवर्षी (2016-17) 1371.92 कोटी केंद्राकडून मिळाले, त्यातील एक हजार 15 कोटी 40 लाखांचा खर्च राज्याने केला आहे. तरीही एकूण देशाचा विचार करता केंद्राकडून मिळालेला निधीच्या प्रमाणात राज्यांकडून कामे होतच नाहीत, असे दिसते. मागच्या वर्षी केंद्राने दिलेलल्या एक लाख कोटी रुपयांपैकी 73 हजार कोटींचा खर्च केल्याचे राज्यांनी कळविले आहे. त्याच्या आधीची दोन वर्षे खर्च न केलेल्या एकूण रकमेचे वार्षिक प्रमाण सरासरी 20 हजार कोटींइतके होते.

विकासाच्या मार्गावर...

55 हजार 921 कि.मी.
देशात सुरू असलेले रस्ते प्रकल्प

3320.38 कि.मी.
महाराष्ट्रातील प्रकल्प

27 हजार कोटी रुपये
राज्यातील प्रकल्पांचा खर्च

26 कि.मी.
देशात सध्या रस्तेबांधणीचा दरदिवशीचा वेग

21 हजार कि.मी.
2017-18 मधील रस्तेबांधणीचे उद्दिष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com