गोव्यात मगोची स्वतंत्र वाटचालीची तयारी

अवित बगळे
बुधवार, 27 जून 2018

विधानसभा निवडणूक भाजप विरोधात लढला आणि निवडणुकीनंतर भाजपलाच पाठींबा का दिला असे विचारल्यावर ते म्हणाले, काँग्रेसची आम्ही तीन दिवस वाट पाहिली. आम्ही काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे यांच्याशी बोलत होतो. त्यांचा नेताच ठरत नव्हता. त्यामुळे वेगळे चित्र आज दिसते. नेता ठरला तेव्हा फार उशीर झाला होता. आताही त्यांच्याकडे राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेतृत्वाची वानवा आहे. अन्यथा सध्याच्या राजकीय परीस्थितीचा फायदा त्यांना झाला असता.

पणजी : गोव्यात भाजप आघाडी सरकारमध्ये असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने स्वतंत्र वाटचालीची तयारी सुरु ठेवली आहे. गेल्या वर्षी या मगो पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढविली होती.

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले, की आम्ही सध्या युतीत असलो तरी त्याचा अर्थ आम्ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक युतीने लढणार असा होत नाही. मगो पून्हा गतवैभव प्राप्त करेल. मतदारसंघात अस्तित्वात असलेल्या समित्यांपर्यंत पक्ष गेल्या कित्येक वर्षात पोचलाच नव्हता. तेथील समित्यांची फेररचना जोडीला महिला व युवक समित्या नेमणे सुरु केले आहे. या वर्षअखेरीस पक्षाची केंद्रीय समितीची फेररचना करून पक्ष नव्या जोमाने कामाला लागेल. 

ते म्हणाले, 13 मतदारसंघात पक्ष संघटनेची बांधणी पूर्ण झाली आहे. उर्वरीत 13 मतदारसंघात ऑक्‍टोबरपर्यंत संघटनात्मक काम पूर्ण होईल. त्यानंतर केंद्रीय समिती निवडली जाईल. त्या समितीत लोक घुसवले जातील अशी टीका व्यर्थ व बिनबुडाची आहे. काम न करणाऱ्या काही जणांना केवळ जागा अडवून केंद्रीय समितीवर राहायचे आहे. हजाराहून जास्त जण आमसभेत मतदान करून ही समिती निवडणार आहेत. या लोकशाहीत कोणाला कसे घुसवता येईल. 

दुसरे म्हणजे पक्ष सोडून गेलेल्या नेत्याना परत घ्या, परत घ्या अशी घोकंपट्टी ऐकायला मिळते. अरे, कोणाला घ्यायचे की नाही ते पक्ष मग ठरवेल. आधी त्या नेत्यांना साध्या कागदावर होय, मला मगो पक्षात यायचे आहे असा अर्ज तरी करू दे. अर्ज करयचा नाही आणि पक्ष प्रवेश कोणी देत नाही असे सांगत फिरायचे हे मगो विरोधी वातावरण तयार करण्याचा डाव आहे. त्यांना आमच्याचमधील काही जणांची साथ मिळते हे पाहून वाईट वाटते. पक्षहित सर्वोच्च असल्यावर अशा गोष्टींना थारा नसतो. पक्षहिताआड वैयक्तीक स्वार्थ आला की अशा गोष्टी सुचतात असे त्यांनी नमूद केले. 

विधानसभा निवडणूक भाजप विरोधात लढला आणि निवडणुकीनंतर भाजपलाच पाठींबा का दिला असे विचारल्यावर ते म्हणाले, काँग्रेसची आम्ही तीन दिवस वाट पाहिली. आम्ही काँग्रेसचे नेते प्रतापसिंह राणे यांच्याशी बोलत होतो. त्यांचा नेताच ठरत नव्हता. त्यामुळे वेगळे चित्र आज दिसते. नेता ठरला तेव्हा फार उशीर झाला होता. आताही त्यांच्याकडे राष्ट्रीय व राज्य पातळीवर नेतृत्वाची वानवा आहे. अन्यथा सध्याच्या राजकीय परीस्थितीचा फायदा त्यांना झाला असता.

Web Title: Maharashtrawadi Gomantak party in Goa