महाराष्ट्रीय गोयल 'सत्तासंकल्पा'साठी सज्ज

महाराष्ट्रीय गोयल 'सत्तासंकल्पा'साठी सज्ज

अर्थसंकल्प 2019 : मुंबई : अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. 1 फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले पीयूष गोयल यांच्यावर दिली गेली आहे. 

मोदी सरकारमध्ये गोयल यांच्यावर सातत्याने महत्त्वपूर्ण कामे सापवली गेली. ऊर्जा राज्यमंत्री या नात्याने सौरऊर्जेला प्रोत्साहन देणारी त्यांनी राबविलेली मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रशंसेचा विषय ठरली. यानंतर रेल्वे खाते अन जेटली आजारी असताना थेट अर्थखात्याच्या हंगामी प्रमुखपदाची जबाबदारी गोयल यांच्यावर आली. प्रकृती अस्वस्थ असली, तरी अरुण जेटलीच मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करतील, असे मानले जात होते. पण, ते शक्‍य होणार नसल्याने पीयूष गोयल यांची निवड झाली. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी गोयल सज्ज झाले अन त्यांनी आठ दिवसांपूर्वीच सर्व दौरे रद्द करून दिल्लीतच राहणे पसंत केले. दक्षिण मुंबईतील अती महत्त्वाच्या वर्तुळात त्यांचा वावर असतो. पण गेले काही दिवस ते मुंबईकडे फिरकले नाहीत. 

गोयल हे अग्रवाल माहेश्‍वरी समाजातील. त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे भाजपचे जनसंघाच्या काळापासूनचे खजिनदार. राज्यसभेवर नियुक्‍त झालेल्या वेदजींच्या घरातून जनसंघाचे अर्थकारण कसेबसे भागवले जाई. वेदप्रकाश गोयल यांच्या मुंबईतील सायन परिसरातल्या निवासस्थानी भाजप नेते मुक्‍कामी असत. अटलबिहारी वाजपेयी यांचेही वास्तव्य तेथे असे. वेदजींच्या पत्नी आणि पीयूष यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल यादेखील राजकारणात आल्या अन आमदार झाल्या. घरात राजकारणाचे बाळकडू मिळालेले पीयूष अभ्यासातही हुशार. चार्टर्ड अकांउंटन्सीची अवघड परीक्षा ते उत्तम गुणांनी पास झाले. जगातल्या हार्वर्ड, ऑक्‍सफर्ड अशा बड्या विद्यापीठात त्यांनी अर्थव्यवस्थापनाचे धडे घेतले. पीयूष गोयल हेही वडिलांप्रमाणे पक्षाचे खजिनदार झाले अन बघता बघता मोदींच्या मर्जीतले बनले. 

ऊर्जाक्षेत्रातील कामगिरीबाबत त्यांचा पेनसिल्वेनिया विद्यापीठाने त्यांचा दोन दिवसांपूर्वीच कॉर्नेट पुरस्काराने गौरव केला. केवळ काही लाखांची गुंतवणूक असलेली त्यांची अन त्यांच्या पत्नी सीमा यांची कंपनी कोट्यवधींचा नफा केवळ दहा वर्षांत दाखवू लागली. हा निधी कुठून आला यावरचे उत्तर होते सल्लागार शुल्क. कंपनीतून प्रचंड नफा मिळवणारे गोयल आता थेट देशाची अर्थसंकल्प सादर करणार आहे. 

महाराष्ट्राला मान 

मुंबई परिसरातून राजकारण करणाऱ्या मोरारजीभाई देसाई यांच्या नावावर आजवर सर्वाधिक 17 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. महाराष्ट्राचे पुत्र असलेले चिंतामणराव उर्फ सी. डी. देशमुख सर्वांत गाजलेले अर्थमंत्री.

त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान लाभलेले यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री तसेच कॉंग्रेसच्या राजवटीत केंद्रात गृहविभागासारखे महत्त्वाचे खाते सांभाळणारे शंकरराव चव्हाण, समाजवादी नेते मधू दंडवते यांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवला आहे. अमराठी पीयूष गोयल अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणारे महाराष्ट्रातले पाचवे नेते आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com