‘सत्याच्या प्रयोगां’तून साकारतोय ‘गांधीपीडिया’

पीटीआय
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

महात्मा गांधी यांचे लेखन, त्यांनी लिहिलेली पत्रे आणि त्यांची भाषणे आदींचा ठेवा लवकरच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार असून, विकीपीडियाच्या धर्तीवर गांधीपीडियाची निर्मिती केली जाणार आहे.

कोलकता - महात्मा गांधी यांचे लेखन, त्यांनी लिहिलेली पत्रे आणि त्यांची भाषणे आदींचा ठेवा लवकरच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार असून, विकीपीडियाच्या धर्तीवर गांधीपीडियाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी आयआयटी- गांधीनगर आणि आयआयटी- खड्‌गपूर यांच्यासह राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (एनएससीएम) या तीन संस्था एकत्रितपणे या प्रकल्पावर काम करत आहेत. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘गांधीपीडिया’चा प्रकल्प आकार घेत आहे.‘गांधीपीडिया’च्या निर्मितीप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती आयआयटी खड्‌गपूरकडून आज देण्यात आली. याबाबतचे सविस्तर निवेदन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या ४० पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांचा क्रम ठरविण्यात येणार आहे. या प्रत्येक पुस्तकातील काही अंश ट्विट ही केला जाणार आहे, असे आयआयटी-खड्‌गपूरकडून सांगण्यात आले. 

पहिल्या टप्प्याच्या माध्यमातून गांधीजींच्या सामाजिक कार्यावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. त्यात गांधीजींवर प्रभाव टाकलेल्या व्यक्ती आणि आणि गांधीजींपासून प्रेरणा घेतलेल्या व्यक्तींचा समावेश असणार आहे. पुढील वर्षी मार्च पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून त्यानंतरचे पाच टप्पे २०२४ पर्यंत पूर्णत्वाला जातील, असेही सांगण्यात आले. या प्रकल्पात सहभागी झालेली एनएससीएम ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे. 

प्रारंभ आत्मचरित्रापासून
‘गांधीपीडिया’बाबत माहिती देताना आयआयटी- खड्‌गपूरच्या संगणकीय विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक अनिमेश मुखर्जी म्हणाले की, पहिल्या टप्प्याची सुरुवात ‘माझे सत्याचे प्रयोग’ या गांधीजींच्या आत्मचरित्रापासून केली जाणार आहे. महात्मा गांधी यांचे लेखन, पत्रव्यवहार आणि त्यांची भाषणे आदींचा खजिना डिजिटल स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi writings, letters he wrote and his speeches etc. available soon online