मंदिरासाठी त्वरित कायदा करा ; केंद्राला संतांचा आदेश

मंदिरासाठी त्वरित कायदा करा ; केंद्राला संतांचा आदेश

नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमीवर रामाच्या मंदिराचे प्रकरण न्यायालयाने इतके दीर्घकाळ लटकावून ठेवून आपल्या कर्तव्यांची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप विश्‍व हिंदू परिषदेने राज्यघटनेने सांगितलेल्या लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभावर केला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर 2018 चा सूर्यास्त होण्याआधी भव्य मंदिराची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना राम मंदिरासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्वरित कायदा करावा, असे आदेशवजा आवाहन देशातील संतमहंतांच्या उच्चाधिकार समितीने आज मोदी सरकारला केले. 

विश्‍व हिंदू परिषद पुरस्कृत संत समितीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींचीही भेट घेऊन निवेदन दिले व कायदा करण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी केली. मात्र मंदिरासाठी कारसेवा करण्याचा निर्णय जाहीर करण्याचे विहिंपने आज टाळले. अयोध्येत मंदिर बनविण्यासाठीचा पुढचा कार्यक्रम 31 जानेवारी व एक फेब्रुवारीला अलाहाबादच्या कुंभमेळ्यातील संतांची महापरिषद जाहीर करेल व हा प्रस्तावित कार्यक्रम "धडक' कार्यक्रम असेल, असा इशारा संत परमानंद महाराज व हंसदेवाचार्य यांनी दिला.

संतांनी सरकारला चार महिन्यांचा "अल्टिमेटम' दिला आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांच्या अध्यक्षतेखाली विहिंपच्या मुख्यालयात झालेल्या संत उच्चाधिकार समिती बैठकीला देशभरातील 50 संत हजर होते असे विहिंपचे कार्याध्यक्ष आलोककुमार व सचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले. आलोककुमार यांनी, न्यायपालिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना, न्यायालयाने आपल्या कर्तव्याची अवहेलना केली, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे संतसमाज न्यायालयाच्या तारखांसाठी वाट पाहणार नाही असे सूचित करताना विहिंपने निवडणुकीच्या वर्षात स्वतःच या मुद्द्यावरील नवी तारीख जाहीर केली आहे. 

बैठकीतील ठळक निर्णय 

- रामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण करावे यासाठी संसदेत लवकरात लवकर कायदा करावा. 
- सर्व राज्यांतील संतमहंत राज्यपालांना याबाबतची निवेदने देतील व राज्यपाल ती पंतप्रधानांकडे पाठवतील. 
- सर्व लोकसभा- राज्यसभा खासदारांना संत घेराव घालून निवेदने देतील. 
- येत्या गीता जयंतीपासून (18 डिसेंबर) देशभरात व्यापक जनजागृती मोहीम राबवून राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यात येईल. 
- अलाहाबादच्या कुंभमेळ्यात 31 जानेवारी व एक फेब्रुवारी 2019 रोजी 20 हजार संतांच्या महासभेत पुढील कारवाई ठरणार. 

राष्ट्रपतींना दिलेले निवेदन 

मंदिर निर्माणासाठी कायदा बनविण्याबाबत देशभरात विशाल जनजागरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय संतसमाजाने घेतला आहे. संसदेत कायदा करून रामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा असे आपण (राष्ट्रपती) आपल्या सरकारला सांगावे.

वर्तमान परिस्थितीत या मुद्द्यावर हाच तोडगा उपयुक्त वाटतो. कारण न्यायालयाच्या निकालाची अनिश्‍चित काळापर्यंत प्रतीक्षा केली जाऊ शकत नाही. 1950 पासून न्यायपालिकेच्या माध्यमातून हिंदू समाज प्रतीक्षा करत आहे; पण विरोधक सुनावणी टाळण्यासाठीच प्रयत्न करत आहेत. आता 29 ऑक्‍टोबरची तारीख दिली असली तरी काय होईल, हे अनिश्‍चितच आहे. त्यामुळे कायद्यासाठी आपण सरकारला आदेश द्यावा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com