Loksabha 2019 : पुतळ्यावरून मोदी-ममता 'आमनेसामने'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार थांबल्यानंतर आता तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.

मऊ/कोलकता : पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार थांबल्यानंतर आता तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. थोर समाजसुधारक ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज परस्परांवर टीका केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकत्यातील रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचारात ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. 

उत्तर प्रदेशातील मऊ येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनीच विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचा आरोप करीत ज्या ठिकाणावरचा हा पुतळा फोडण्यात आला तेथेच पंचधातूपासून तयार करण्यात आलेला विद्यासागर यांचा मोठा पुतळा उभारण्याची घोषणा केली. या घोषणेला ममतांनी कोलकत्यातील सभेत प्रत्युत्तर देताना पश्‍चिम बंगालला विद्यासागर यांचा पुतळा उभारण्यासाठी भाजपच्या पैशांची गरज नसल्याचे सांगत आमच्याकडे मुबलक स्रोत असल्याचा दावा केला. 

ममता म्हणाल्या, ""मोदींनी कोलकत्यामध्ये ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. आम्ही यासाठी भाजपचे पैसे कशाला घ्यावेत? पश्‍चिम बंगालकडे यासाठी मुबलक आर्थिक स्रोत आहेत. पुतळ्यांची मोडतोड करणे, हा भाजपचा छंदच असून, त्रिपुरामध्ये त्यांनी हेच केले. भाजपने पश्‍चिम बंगालचा दोनशे वर्षांचा वारसा नष्ट केला असून, या पक्षाचे समर्थन करणाऱ्यांचा समाज कधीच स्वीकार करणार नाही.'' 

कठोर कारवाई करा : मोदी

मऊ (उत्तर प्रदेश) : "तृणमूल'च्या गुंडांनीच ईश्‍वरचंद्र विद्यासगार यांचा पुतळा तोडला. पुतळ्याला हात लावणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. तृणमूल कॉंग्रेसला सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्वीच्याच ठिकाणावर विद्यासागर यांचा पंचधातूचा भव्य पुतळा उभारू.

आताही मी डम डम येथील प्रचार सभेसाठी येत असताना माझ्या मनात विचार आला, की ममता खरोखरच माझे हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरू देतील की नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केली. मोदींनी या वेळी मायावतींवरदेखील टीका केली. प. बंगाल सरकार यूपी, बिहार आणि पूर्वांचलमधील लोकांना लक्ष्य करीत असताना बहेनजी त्यावर काहीही बोलत नाहीत. त्यांना केवळ सत्तेचीच चिंता असल्याचे मोदींनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamata banerjee and Narendra Modi Criticizes each other on Statue Issue