सह्याद्रीचा वाघ अन्‌ सुंदरबनची वाघीण 

श्रीमंत माने
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या प्रसिद्ध "शिवाजी' कवितेत रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली जनतेला केलेलं आवाहन

छत्रपती शिवरायांवर लिहिलेल्या प्रसिद्ध "शिवाजी' कवितेत रवींद्रनाथ टागोरांनी बंगाली जनतेला केलेलं आवाहन

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिकदृष्ट्या गंभीरपणं घेतलं की काय? हे सांगता येणार नाही. तथापि, नोटाबंदीच्या विरोधात एकत्र येताना त्यांनी देशाची पूर्व-पश्‍चिम ही भौगोलिक टोके जोडली खरी! आधी मोदी लाटेत लोकसभेवेळी व नंतर गेल्या एप्रिलमधल्या विधानसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगाल राज्य तृणमूल कॉंग्रेससाठी बऱ्यापैकी सुरक्षित केल्यानंतर ममतादीदी निवांत झाल्या असाव्यात. कदाचित, 2019 ची संधी त्यांना खुणावत असावी. तशाही बंगालची वाघीण म्हणवल्या जाणाऱ्या ममतादीदी महत्त्वाकांक्षा लपवून ठेवणाऱ्या नाहीत. पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळं त्यांना आयती संधी चालून आली. त्या तडक दिल्लीत रस्त्यावर उतरल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटायला जाताना त्यांनी शिवसेना, आम आदमी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स अशा बिगरकॉंग्रेस-बिगरभाजप पक्षांना सोबत घेतले. दिल्लीतले राजकारण थोडे तिकडंच ठेवलं तरी महाराष्ट्रात लोकांना पडलेला प्रश्‍न आहे तो, शिवसेनेचा वाघ सुंदरबनातल्या वाघिणीच्या प्रेमात असा अचानक कसा काय पडला?

या प्रश्‍नाचं उत्तर भारतीय जनता पक्षाच्या हल्ल्यांनी घायाळ झालेल्या मराठी वाघाच्या वेदनांमध्ये दडलंय. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर भाजपला महाराष्ट्राची सत्ता स्वबळावर मिळविण्याची स्वप्नं पडली. त्यासाठी पंचवीस वर्षांची युती तोडली गेली. साम-दाम-दंड-भेद अशा सर्व ताकदीनिशी अमित शहा व मंडळी महाराष्ट्रावर चाल करून आली. उद्धव ठाकरे यांनी त्या आक्रमणाची तुलना अफजलखानाच्या फौजेशी केली. त्या वादळात शिवसेना संपेल, असंही काहींना वाटले; पण मतदार ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. भाजपला निर्भेळ यश मिळू शकलं नाही. दोन्ही पक्षांना पुन्हा एकत्र यावं लागले. सध्या राज्यात युतीच सत्तेत असली, तरी दोन वर्षांत या संसारात भांड्यांची आदळआपट झाली नाही, असा एकही महिना गेला नाही. मुंबईसह दहा प्रमुख महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि भाजप पुन्हा शिवसेनेलाच आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे. 

नेमकं पश्‍चिम बंगालमध्येही असंच झालं होतं. विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाला, खासकरून पक्षाध्यक्ष अमित शहा यांना तिथल्या ताकदीचा जरा अधिकच साक्षात्कार झाला होता. ते कोलकात्यावर चाल करून गेले होते. दीदींची सत्ता उखडून टाकण्यासाठी मोठमोठ्या सभांचा धडाका लावला होता. महाराष्ट्रात बऱ्यापैकी ताकद असल्याने भाजप धाकट्यांचा थोरला झाला; पण पश्‍चिम बंगालवरील आक्रमण अगदीच फुसकं निघालं. तिथल्या जनतेनं ममता बॅनर्जींच्या पदरातच तब्बल 71 टक्‍के जागा टाकल्या. दीदी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या. भाजपला अवघ्या सहा जागा जिंकता आल्या. भाजपला प्रमुख विरोधी पक्षही बनणंही जमलं नाही. कॉंग्रेस व डाव्यांची आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 

तर सांगण्याचा मुद्दा देशाच्या पश्‍चिम व पूर्व टोकांवरील दोन्ही राज्यांची राजकीय स्थिती अशी जवळपास एकसारखी आहे. दोन्हीकडचा मतदार प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षांमागे आहे. दोन्हीकडे भाजप हेच प्रादेशिक पक्षांपुढचं प्रमुख आव्हान आहे. शिवसेना व तृणमूल कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना एकत्र येण्यासाठी ही कारणे पुरेशी आहेत. 

आणखी एक घटनाक्रम नमूद करायला हवा. नोटाबंदीचा निर्णय मोदींनी 8 नोव्हेंबरला जाहीर केला. लगेच ते जपानच्या दौऱ्यावर गेले. परतल्यावर पुण्यात "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'च्या कार्यक्रमात ते शरद पवारांसोबत होते. दरम्यान, चार दिवस भाजपच्या "सोशल मीडिया' यंत्रणेतील टवाळखोर पवारांच्या विरोधात अक्षरश: "सुटले' होते. ""मी पवारांचं बोट धरून राजकारण करत आलो'', असं मोदींनी जाहीरपणे सांगितल्यावर त्या टवाळखोरांची दातखीळ बसली असावी. मतदारांमध्ये जायचा तो संदेश गेला आणि ममता बॅनर्जी-उद्धव ठाकरे यांचा "संवाद' सुरू झाला. थोडक्‍यात, "ज्यांच्यावर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याशी संग कराल, तर आम्ही वेगळा मार्ग धरू', हा शिवसेनेनं मोदींना दिलेला इशारा आहे. हा वेगळा मार्ग शिवसेनेच्या आक्रमकतेशी मिळताजुळता आहे. ममता बॅनर्जी किती आक्रमक आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या खासदाराची लोकसभेत बकोट धरणं, थेट सोमनाथ चटर्जी यांच्यावर कागद भिरकावणं किंवा भाजपप्रणीत "एनडीए' असो कॉंग्रेसप्रणीत "युपीए' एका क्षणात राजीनामा फेकून कोलकात्याला निघणं, अशी किती तरी उदाहरणे देता येतील. म्हणजे भाजप जितके समजतो तितके आम्ही दुबळे नाही, हे सांगताना वाघाचा पंजा व वाघिणीचा फणकारा, असा मेळ जुळून आलाय खरा! 

प्रादेशिक अस्मितेच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर पुढं जाण्यासाठी आसुसलेल्यांमध्ये केवळ ममतादीदी किंवा उद्धव ठाकरे हेच आहेत, असं अजिबात नाही. जयललितांची तब्येत बरी असती तर कदाचित नोटाबंदीच्या विरोधात त्याही तितक्‍याच आक्रमक झाल्या असत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा अध्यक्ष शरद पवारांचा पाठिंबाही किती दिवस राहील, याची खात्री नाही. नितीशकुमार, लालूप्रसाद, नवीन पटनायक, उमर अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल असे अनेक या रांगेत आहेत. चंद्राबाबू किंवा चंद्रशेखर राव यांना सध्या भाजपने सांभाळून ठेवलंय म्हणून नाही तर त्यांचीही महत्त्वकांक्षा कधी उफाळून येईल सांगता येत नाही. अशावेळी वाघ-वाघिणीची जवळीक पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकते की नाही? याकडे सर्वांचे लक्ष असेल. 

Web Title: Mamata Banerjee & Uddhav Thackeray