ममतांचा यूटर्न - पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याकडे फिरविली पाठ

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेण्यास ममतांनी नकार दिला असून राज्यात सध्या व्यक्तिगत राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात भाग घेण्यास ममतांनी नकार देत असताना राज्यात सध्या व्यक्तिगत राजकारण होत असल्याचा आरोप केला.

ममता यांनी ट्विटरद्वारे प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, ''पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात 54 लोक ठार झाल्याची चुकीची माहिती भाजप देत आहे. एक तासापूर्वी ही माहिती प्राप्त झाल्याने मी शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहे.''

मंगळवारी (ता. 28) ममता बॅनर्जी यांनी शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याबाबत संमती दर्शविली होती. हा शपथविधी समारंभ गुरुवारी (ता. 30) सायंकाळी सात वाजता होणार असून यावेळी देश-विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा एक संवैधानिक शिष्टाचार असल्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहणार असून याबाबत इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे ट्विट ममता यांनी केले होते.  

ममता म्हणाल्या की, संविधानात नमूद केल्याप्रमाणे, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा शपथविधी कार्यक्रम हे औपचारिक कार्यक्रम असे आहेत, ज्यामध्ये निमंत्रण मिळाल्यावर सहभागी होण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे. 

विजयन ही राहणार अनुपस्थित

दरम्यान, केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री पिनराई विजयन हे सहभागी होणार नाहीत, अशी माहिती दिली आहे. 

पिनराई विजयन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असून सध्या केरळचे मुख्यमंत्री आहेत. विजयन यांच्या शपथविधी कार्यक्रमास अनुपस्थित राहण्याच्या माहितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील भाजपची कामगिरी खराब झाली. केरळमधील लोकसभेच्या 20 जागांपैकी काँग्रेसला 15 जागा, इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) ला दोन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीएम) ला एक, रिव्हॉल्युएशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी) ला एक आणि केरळ काँग्रेस (एम) यांना एक जागा मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee will not attend Prime Minister Narendra Modis oath taking ceremony