
मोठी बातमी ! ममता-अखिलेश यादव यांनी स्थापन केली नवी आघाडी; काँग्रेसपासून ठेवला दुरावा
नवी दिल्ली - केंद्रातील तीन प्रमुख विरोधी पक्षांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्रातील दोन्ही राजकीय पक्ष आपल्याला समान वागणूक देतील असे संकेत दिले आहेत.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील आठवड्यात ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांची ही भेट घेणार आहेत.
दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी म्हटलं की, "राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक आहे. जोपर्यंत राहुल माफी मागत नाहीत तोपर्यंत भाजप संसदेचे कामकाज चालू देणार नाही. याचा अर्थ त्यांना काँग्रेसचा वापर करून संसद चालू द्यायची नाही. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाचा चेहरा व्हावा, अशी भाजपची इच्छा आहे. जेणेकरून त्याचा फायदा भाजपला होईल, असंही ते म्हणाले.
काँग्रेस हा विरोधकांचा 'बिग बॉस' आहे, असे वाटणे हा भाजपचा भ्रम आहे. मुख्यमंत्री ममता बनर्जी 23 मार्चला नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत. आम्ही इतर विरोधी पक्षांशी (भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतर ठेवण्याच्या योजनेवर) चर्चा करू. ही तिसरी आघाडी आहे असे आम्ही म्हणत नाही, पण भाजपला टक्कर देण्याची ताकद प्रादेशिक पक्षांमध्ये आहे, असही बंदोपाध्याय म्हणाले.