नोटाबंदीमुळे बॅंकेत हप्ता भरता न आल्याने आत्महत्या?

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीच्या निर्णयामुळे बॅंकेसमोर मोठ्या रांगा असल्याने दिल्लीतील एका व्यक्तीला आपल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम बॅंकेत जमा करता न आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र अद्याप अशा निष्कर्षापर्यंत पोचता येणार नसल्याचे म्हणत कर्जबाजारी झाल्याने त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयामुळे बॅंकेसमोर मोठ्या रांगा असल्याने दिल्लीतील एका व्यक्तीला आपल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम बॅंकेत जमा करता न आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र अद्याप अशा निष्कर्षापर्यंत पोचता येणार नसल्याचे म्हणत कर्जबाजारी झाल्याने त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र याचबरोबर काही धक्कादायक घटनाही समोर येत आहे. अशीच एक घटना दिल्लीतून समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील गोकुळपुरा परिसरातील मोहम्मद शकील (वय 35 वर्षे) हे गेल्या काही दिवसांपासून बॅंकेच्या रांगेत उभे होते. त्यांना बॅंक ऑफ बडोदामध्ये कर्जाच्या हप्त्याची रक्कम जमा करायची होती. "मात्र बॅंकेसमोरील मोठ्या रांगेत अनेकदा उभे राहूनही ते कर्जाचा हप्ता बॅंकेत जमा करू शकले नाहीत. या प्रकारातून अस्वस्थ झाल्याने त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली', असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र "शकील यांचा भंगारविक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्यावर फार मोठे कर्ज होते. ते अनेक लोकांना पैसे परत करू शकत नव्हते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

वधूपित्याचा आत्महत्येचा प्रयत्न
नोटाबंदीमुळे मुलीच्या विवाहसाठी बॅंकेतून पैसे काढता न आल्याने राजस्थानमधील सिकानेर येथे एका वधूपित्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रैवासा गावातील रमेश शर्मा यांच्या मुलीचा विवाह ठरला होता. येत्या आठ डिसेंबर रोजी तिचा विवाह होणार आहे. मात्र विवाहखर्चासाठी पैसे काढण्यासाठी रमेश अनेकदा बॅंकेसमोर रांगेत उभे राहिले. परंतु त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यांना बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा गावातील सरपंचांनीही मदत केली नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या रमेश यांनी नातेवाईकांकडून दोनशे रुपये उधार घेतले. त्या पैशातून त्यांनी मद्यपान केले आणि रेल्वेरूळासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे चालकाच्या प्रसंगावधनामुळे रमेश यांचे प्राण वाचले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Man commits suicide; family says he was upset after demonetisation