मालकाच्या कुटुंबियांनी पेटविल्याने भारतीय तरुणाचा रियाधमध्ये मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नोकरीच्या निमित्ताने रियाधमध्ये असलेल्या हैदराबादमधील अब्दुल कादेर या तरुणाला नोकरी देणाऱ्या मालकाच्या कुटुंबियांनी पेटवून दिल्याने मृत्यू झाल्याचीर धक्कादायक घटना समोर आली आहे.

हैदराबाद - नोकरीच्या निमित्ताने रियाधमध्ये असलेल्या हैदराबादमधील अब्दुल कादेर या तरुणाला नोकरी देणाऱ्या मालकाच्या कुटुंबियांनी पेटवून दिल्याने अब्दुलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नोव्हेंबर 2015 मध्ये अब्दुल रियाधला गेला होता. मात्र, तेथील नोकरीबाबत तो समाधानी नव्हता आणि त्याला परतायचे होते, अशी माहिती अब्दुलची बहिण शबाना बेगम हिने दिली. दरम्यान 30 मार्च रोजी मालकाच्या कुटुंबियांशी झालेल्या वादातून त्याला पेटवून देण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना शबाना म्हणाली, "मागील महिन्यात 28 मार्च रोजी माझा मोठा भाऊ कादेरशी बोलला. पगार मिळत नसल्याचे कादेरने त्यावेळी सांगितले. समाधानी नसल्याचे सांगत त्याने लवकरात लवकर भारतात परतायचे असल्याचेही सांगितले. त्यानंतर आम्हाला समजले की 30 मार्च रोजी कादेरला पेटवून दिल्याने तो 75 टक्के भाजला आहे आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आज आम्हाला समजले की उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.'

या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही शबानाने यावेळी केली.

Web Title: Man dies after being set ablaze in Riyadh, kin seeks govt intervention