मित्राच्या पत्नीवर जडलं प्रेम अन् घडलं आक्रीत...

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

मित्राच्या पत्नीवर प्रेम जडलं. दोघांमध्ये प्रेमसंबधही निर्माण झाले. दोघेही अखंड प्रेमात बुडाले. मात्र, प्रेमामध्ये मित्राचा अडसर येत होता.

नवी दिल्ली: मित्राच्या पत्नीवर प्रेम जडलं. दोघांमध्ये प्रेमसंबधही निर्माण झाले. दोघेही अखंड प्रेमात बुडाले. मात्र, प्रेमामध्ये मित्राचा अडसर येत होता. यामुळे मित्रानेच मित्राचा काटा काढला.

मित्राची हत्या करणाऱ्या 20 वर्षाच्या युवकाला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मित्राच्या पत्नीसोबत विवाह करण्यासाठी त्याने मित्राची हत्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गुलकेश (वय 20) हा एका कंपनीमध्ये काम करतो. त्याचे मित्राच्या पत्नीवर (वय 30) प्रेमसंबंध सुरू होते. गुलकेशला मित्राच्या पत्नीसोबत विवाह करायचा होता. परंतु, पती असल्यामुळे तिने विवाहाचा प्रस्ताव नाकारला. यामुळे गुलकेशने मित्राचा खून करण्याचा विचार केला. गुलकेशने सोमवारी (ता. 24) रात्री दलबीर या मित्राला फोन करुन बोलावले. झकीरा येथील रेल्वे ट्रॅकजवळ तो दलबीरला घेऊन गेला. यावेळी त्याने दलबीरच्या डोक्यात विट घातली. यामुळे तो जागीच बेशुद्द पडला. यानंतर गुलकेशने दलबीरचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकून दिला. मृतदेहाचे तुकडे व्हावेत आणि पोलिसांना आपला पत्ता लागू नये, यासाठी त्याने केले होते. दलबीरच्या हत्येनंतर गुलकेशने पोलिसांना फोन करुन रेल्वे ट्रॅकजवळ ओळखीच्या व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती दिली.'

दरम्यान, तपासादरम्यान गुलकेशचा मोबाइल तपासण्यात आला व पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने दलबीरचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. दलबीर हा मित्र होता व त्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली गुलकेशने दिली. दलबीरच्या पत्नीसोबत विवाह करायचा होता. पण ती तयार होत नव्हती. तिने आपल्याशी विवाह करावा, यासाठी मित्राचाच काटा काढायचे ठरवले.' असे तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man kills friend to marry his wife at delhi