बहिणीला होणाऱ्या त्रासापासून सुटका देण्यासाठी भावाने केली मतिमंद मुलांची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

मल्लिकार्जुन असे त्या आरोपीचे नाव आहे. मल्लिकार्जुन याची बहिण लक्ष्मी आणि तिचे पती श्रीनिवास रेड्डी यांना मुलगी श्रीजना रेड्डी आणि मुलगा विष्णूवर्धन रेड्डी होता. हे दोघेही जुळे आणि 12 वर्षांचे होते.

हैदराबाद : आपल्या बहिणीच्या दोन जुळ्या मतिमंद मुलांचा सांभाळ करताना बहिणीला होत असलेल्या त्रासापासून सुटका देण्यासाठी तिच्या भावाने आपल्या सख्ख्या भाच्यांची हत्या केली. या विचित्र अशा प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. याबाबतची माहिती आज (शनिवार) पोलिसांनी दिली. 

मल्लिकार्जुन असे त्या आरोपीचे नाव आहे. मल्लिकार्जुन याची बहिण लक्ष्मी आणि तिचे पती श्रीनिवास रेड्डी यांना मुलगी श्रीजना रेड्डी आणि मुलगा विष्णूवर्धन रेड्डी होता. हे दोघेही जुळे आणि 12 वर्षांचे होते. मात्र, हे दोघेही मतिमंद असल्याने त्यांचा सांभाळ करताना त्याची बहिण लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना मोठा त्रास होत असल्याने मल्लिकार्जुनने या भावंडांचा ते राहत असलेल्या भाड्याच्या घरात त्यांची गळा दाबून हत्या केली. ही घटना हैदराबाद शहरातील चैतन्यपूरी भागात शुक्रवारी घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की या दोघांचे मृतदेह गाडीत असल्याचे समजल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मल्लिकार्जुन, त्याचा मित्र व्यंकटरमी रेड्डी आणि वाहनचालक विवेक रेड्डीला अटक केली. तसेच याबाबत त्या बालकांच्या पालकांनी सांगितले, की हे दोघे जुळे बालपणापासून मुके आणि मतिमंद होते.

दरम्यान, याप्रकरणी या पालकांनी मल्लिकार्जुनच्या विरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

Web Title: Man kills sisters mentally challenged kids in Hyderabad