लोकसभेत अचानक उडी मारणारा अटकेत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

संसदेमधील सदस्य सभागृहाबाहेर पडत असतानाच प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये सुरक्षा रक्षक एका व्यक्तीबरोबर झटापट करत असल्याचे आढळून आले. या व्यक्तीचा उजवा पाय सभागृहाभोवती असलेल्या लाकडी कुंपणाभोवती लटकत होता. लवकरच सुरक्षा रक्षकाने या व्यक्तीस पुन्हा वर ओढून घेण्यामध्ये यश मिळविले.

नवी दिल्ली - लोकसभेमध्ये आज (शुक्रवार) नोटाबंदीसंदर्भातील मुद्यावरुन गोंधळ सुरु असतानाच प्रेक्षकांच्या हौद्यामधून (गॅलरी) एका व्यक्तीने खाली सभागृहात उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.

आज सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केल्याने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज 40 मिनिटांकरिता तहकूब केले. यानंतर संसदेमधील सदस्य सभागृहाबाहेर पडत असतानाच प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये सुरक्षा रक्षक एका व्यक्तीबरोबर झटापट करत असल्याचे आढळून आले. या व्यक्तीचा उजवा पाय सभागृहाभोवती असलेल्या लाकडी कुंपणाभोवती लटकत होता. लवकरच सुरक्षा रक्षकाने या व्यक्तीस पुन्हा वर ओढून घेण्यामध्ये यश मिळविले. या व्यक्तीने सभागृहाच्या मुख्य भागामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

या गॅलरीमधील इतर नागरिकांना यानंतर खबरदारीने बाहेर काढण्यात आले. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी दिल्ली पोलिस दलाचे कर्मचारी साध्या वेशामध्ये या गॅलरीत बसत असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.

हा प्रकार घडल्यावेळी पंतप्रधान व अध्यक्ष सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व समाजवादी पक्षाचे मुख्य नेते मुलायम सिंह यादव यांच्यासहित अनेक वरिष्ठ राजकीय नेते सभागृहात उपस्थित होते.

 

Web Title: Man tries to jump into Lok Sabha