मणिपूरच्या "आयर्न लेडी' अखेर विवाहबद्ध

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल हे शांत शहर आहे आणि माझा शांततेचा शोध येथे पूर्ण झाला. येथील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आदिवासींच्या कल्याणासाठी आपण आवाज उठविणार आहे

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व मणिपूरच्या "आयर्न लेडी' इरोम शर्मिला या डेस्मंड कुटुन्हो यांच्याशी आज (गुरुवार) विवाहबद्ध झाल्या.

कोडाईकॅनलमधील उपनिबंधक कार्यालयात विशेष विवाह कायद्यानुसार साध्या पद्धतीने त्यांचा विवाह झाला. कुटिन्हो यांनी शर्मिला यांच्या बोटात अंगठी घातली. या प्रसंगी उपनिबंधक राधाकृष्ण उपस्थित होते, मात्र वधू व वराचे कुटुंबीय अनुपस्थित होते. शर्मिला व कुटिन्हो यांचा विवाह आंतरधर्मीय असल्याने आधी हिंदू विवाह कायद्यानुसार त्यांचा विवाह झाला. नंतर उपनिबंधकांनी विशेष विवाह कायद्यानुसार त्याची नोंदणी करण्यास सांगितले.

"कोडाईकॅनल हे शांत शहर आहे आणि माझा शांततेचा शोध येथे पूर्ण झाला. येथील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आदिवासींच्या कल्याणासाठी आपण आवाज उठविणार आहे,'' असे इरोम शर्मिला त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ब्रिटनचे नागरिक असलेले कुटिन्हो हे शर्मिला यांचे पूर्वीपासूनचे साथीदार आहेत. या दोघांनी नोंदणी पद्धतीच्या विवाहासाठी 12 जुलै रोजी अर्ज भरला होता.

विवाहाला आक्षेप
कोडाईकॅनलमधील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व्ही. माधवन यांनी या विवाहाला आक्षेप घेतला होता. ""जर हे दांपत्य येथे राहिले तर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन आदिवासींना त्याचा त्रास होईल,'' असा दावा त्यांनी केला. मात्र उपनिबंधकांनी हा आक्षेप फेटाळून लावीत शर्मिला यांच्या विवाहाला परवानगी दिली.

Web Title: manipur news; irom sharmila marriage

टॅग्स