मणिपुरी जनतेचा संमिश्र कौल 

राहुल कर्माकर
रविवार, 12 मार्च 2017

भाजप ईशान्य भारतात पाय रोवण्याच्या इराद्याने या निवडणुकीत उतरला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 'आसाम फॉर्म्युला' वापरला.

मणिपूरमध्ये 2002 पासून कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत असल्याने यंदाही दोन प्रमुख पक्षातच लढत होईल, असा कयास बांधला जात होता; परंतु निकाल पाहता मतदारांचा कौल संदिग्ध असल्याचे जाणवते. मागील दोन निवडणुकीत कॉंग्रेसला कोणीही स्पर्धक नव्हता. भाजपने 2012 च्या निवडणुकीत केवळ 19 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यापैकी बहुतांश उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली होती, हे विशेष.

सायंकाळी पाचपर्यंत जाहीर झालेल्या 55 जागांपैकी 24 जागांवर कॉंग्रेसने आघाडी घेतली होती आणि भाजपच्या खात्यावर 20 जागा जमा झाल्या होत्या. बहुमत सिद्ध करण्यासाठी 31चे संख्याबळ गाठणे आवश्‍यक आहे. भाजप ईशान्य भारतात पाय रोवण्याच्या इराद्याने या निवडणुकीत उतरला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 'आसाम फॉर्म्युला' वापरला. कॉंग्रेसमधून आयात केलेल्या आमदारांना आणि ज्येष्ठ नेत्यांना तिकिटे दिली. भाजपने एक दोन नव्हे तर सहा कॉंग्रेस आमदारांना ओढले होते; परंतु त्याचा अपेक्षित परिणाम कॉंग्रेसवर झालेला दिसून येत नाही.

प्रचारादरम्यान भाजपने कॉंग्रेसवर आणि मुख्यमंत्री ओकरम इबोबी सिंह यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. वाढता भ्रष्टाचार आणि विकासाचा अभावाच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेसवर टीका करत मणिपूर बदलण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. तसेच, इम्फाळ खोऱ्यातील बिगर आदिवासी मैती आणि डोंगराळ भागातील आदिवासी नागा यांच्यात जाणीवपूर्वक मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्नही भाजपने केले. इम्फाळ खोऱ्यात तब्बल चाळीस जागा होत्या.

याठिकाणी नागाविरोधी भावनांना फुंकर घालण्यात आली. मणिपूरच्या डोंगराळ भागात नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड ही दहशतवादी संघटनेचा नागा जमातीचे वेगळे राज्य करण्याच्या तयारीत आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून राज्यात 30 नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये 'आर्थिक नाकेबंदी' केली आहे. या नाकेबंदीला दोन्ही पक्षांनी एकमेकांस जबाबदार धरले आहे. 
विधानसभेचे सध्याचे निकाल पाहता राजकीय विश्‍लेषकांना सध्या दोन पर्याय दिसतात. कॉंग्रेस हा संख्याबळानुसार सर्वांत मोठा पक्ष असल्याने राज्यपाल नजमा हेपतुल्ला त्यांना आमंत्रित करून संख्याबळ सिद्ध करण्यास सांगतील. यात लहान पक्ष आणि अपक्ष महत्त्वाची भूमिका वठवू शकतात. 

प्रादेशिक पक्षांची कामगिरी यंदा चांगली झाली आहे. नॅशनल पीपल्स पार्टी आणि नागा पीपल्स फ्रंट यांना प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री थौनाऊजाम चाओबा हे भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते. त्यांनी नामबोल येथील आपली जागा गमावली. केवळ 280 मतांनी त्यांना कॉंग्रेस उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. कॉंग्रेस सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरली तर इबोबी सिंह हे ईशान्य भारतातील पक्षाचे मोठे नेते म्हणून नावारूपास येतील. जर भाजपची सरशी झाली तर आसाम, अरुणाचल प्रदेश यानंतर मणिपूरही ताब्यात येईल आणि पक्षाची स्थिती आणखीच मजबूत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manipuri people give mixed verdict