
Manish Sisodia : सिसोदिया यांना कुख्यात गुन्हेगारांमध्ये ठेवले? तिहार तुरुंग प्रशासन म्हणतं...
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देशातील सर्वात धोकादायक आणि कुख्यात गुन्हेगारांसह तिहार तुरुंगातील कक्ष क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना 'विपश्यने'चे ध्यान करण्यासही मनाई करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हे आरोप केले. दुसरीकडे तिहार तुरुंग प्रशासनाने एक निवेदन जारी करून 'आप'चे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तिहार प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मनीष सिसोदिया यांना कारागृहात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
मनीष सिसोदिया जिथे आहेत तिथे कुख्यात एकही कैदी नाही. मनीष सिसोदिया यांना एका वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे, जिथे ते ध्यान करू शकतात. कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया दिल्लीच्या तिहार तुरुंगात २० मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी भोगत आहेत.
'आप' प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मनीष सिसोदिया यांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली की ते हिंसक आणि धोकादायक गुन्हेगारांसोबत तुरुंगात आहेत. या गुन्हेगारांविषयी टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा बातम्या आल्या आहेत. त्यातील काही भयंकर गुन्हेगार आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. जे कोणाच्या इशाऱ्यावर कोणालाही ठार मारू शकतात. त्यांच्यावर आधीच इतके गुन्हे दाखल आहेत, त्यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली तरी त्यांना काहीही वाटणार नाही. मात्र आपचे आरोप तुरुंग प्रशासनाने फेटाळले आहेत.