Mann Ki Baat : संकट घेऊन आलेल्या 2020 ने शिकवली 'आत्मनिर्भरता' : PM मोदी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

त्यांची ही 72 वी मन की बात आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या वर्षीच्या शेवटच्या 'मन की बात'मध्ये अनेक विषयांवर संवाद साधला. सुरवातीलाच त्यांनी म्हटलं की 2020 हे वर्ष मोठ्या संकटांनी भरलेलं होतं. मात्र, संकटेच नवं काहीतरी शिकण्याची संधी देतात. या संकटातून आपण 'आत्मनिर्भरता' शिकलो असं मोदी म्हणाले. या मन की बातमध्ये मोदींनी अनेक सकारात्मक बाबींना नमूद केलं. या मन की बात मध्ये मोदी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कृषी कायद्यांबाबत बोलतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. शेतकरी आंदोलनातील आंदोलकांनी या मन की बातला विरोध करणार असल्याचं सांगितलं होतं. 

त्यांनी म्हटलं की, कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. आपण प्रत्येक संकटातून काही शिकत असतो. राष्ट्राने या दरम्यान काही नव्या क्षमता निर्माण केल्या. या क्षमतेलाच आपण 'आत्मनिर्भरता' म्हणू शकतो. ग्राहक मेड इन इंडिया खेळण्यांची मागणी करत आहेत. विचारप्रक्रियेत झालेला हा मोठा बदल आहे. एका वर्षात लोकांच्या वर्तनात झालेला हा मोठा बदल आहे. इतके परिवर्तन घडवून आणणे सहज शक्य नव्हते.  

पुढे त्यांनी भारतातील बिबट्यांच्या संख्येबाबत एक सकारात्मक माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, भारतात 2014 ते 2018 च्या दरम्यान बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. 2014 मध्ये बिबट्यांची संख्या 7,900 होती. 2019 मध्ये ती 12,852 वर जाऊन पोहोचली. भारतातील अनेक राज्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात हे प्रमाण अधिक आहे. 

या मन की बातमध्ये मोदींनी देशवासीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन करताना म्हटलं की, दररोज वापरल्या जाणार्‍या वस्तूंची यादी तयार करा आणि विश्लेषण करा की आयात केलेल्या किती वस्तू नकळतपणे आपल्या आयुष्याचा भाग बनल्या आहेत. एकप्रकारे या विदेशी वस्तूंनी आपल्याला त्यांचे बंदिवान बनविले आहे. मी आपणास आवाहन करतो की आपण त्यांचे भारतीय पर्याय शोधूया आणि भारतीयांच्या कठोर परिश्रमांनी निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प आपण करुया.

तसेच त्यांनी म्हटलं की, हा दिवस अनेकांचे हौतात्म्य आठवण्याचा दिवस आहे. या दिवशी गुरु गोविंदसिंग जी यांच्या आई माता गुजरी जी यांनी शहादत स्वीकारली. सुमारे एक आठवडा पूर्वीचा श्रीगुरु तेग बहादुरजींचा शहादत दिवस होता. दिल्लीतील गुरुद्वारा रकब गंज येथे श्रीगुरू तेग बहादुर जी यांना नमन करण्यास मला विशेषाधिकार लाभला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mann Ki Baat Pm modi delivering his last mann ki baat of this year