मन की बात : पंतप्रधान मोदी म्हणतात, 'लेखक, कथाकारांनो गोष्टी सांगा'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

कोरोनाने आपल्याला एकत्र राहण्याचं महत्त्व शिकवलं असून या परिस्थितीत गोष्ट सांगण्याची कला शिका असंही मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे संबोधित केलं. यावेळी मोदींनी सध्या कोरोनाच्या संकटात शेतकरी पाय जमिनीत घट्ट रोवून उभा असल्याचं म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा शेतकरी हा कणा असल्याचं सांगितलं. मोदी म्हणाले की, जो मातीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. देशातील शेतकरी याचेच उदाहरण आहेत. त्यांनी कोरोनाच्या या संकटाला धैर्याने तोंड दिलं. 

शेतीच्या क्षेत्रीत अनेक नवे बदल घ़डत आहेत. या बदलांबाबत शेतकरी संघटना माझ्यासोबत चर्चा करत असतात. जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना शेतकरी बांधव ज्या पद्धतीनं करत आहेत ते पाहिलं की एक आदर्श सर्वांसमोर दिसतो असंही मोदींनी मन की बात मधून सांगितलं. कोरोना महासाथीच्या काळात शेतकऱ्यांच्या कामाचं कौतुक मोदींनी केलं. 

कोरोनाच्या संकटाचा एक फायदा झाला असंही मोदींनी मन की बात या कार्यक्रमात सांगितलं. मोदी म्हणाले की, कोरोनाच्या काळात जग नव्या आव्हानांचा सामना करत आहे. पण या संकटाचा फायदासुद्धा झाला. अनेक कुटुंबे एकत्र आली. भारतात लॉकडाऊनला सहा महिन्यांहून अधिक काळ झाला. लोकांना घरी राहणं कठीण होत आहे. बदललेली कुटुंब पद्धती, घरात जेष्ठ माणसं नसल्यानं गोष्टी सांगायला कोणी नसल्याचंही मोदींनी सांगितलं. 

बाहेर लॉकडाऊऩ, सतत घरीच असलेल्या लोकांना काम नाही. अशा परिस्थितीत वेळ कसा घालवायचा असा प्रश्न कुटुंबातील लोकांसमोर निर्माण झाला आहे. आपल्या देशाला पंचतंत्राची परंपरा असल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान, मन की बात या कार्यक्रमात स्टोरी टेलिंगच्या प्रतिनिधींनी तेनाली राम आणि कृष्णदेवराय यांची गोष्ट सांगितली. त्यानंतर मोदींनी म्हटलं की, देशातल्या नागरिकांनी आता दर आठवड्याला गोष्टींसाठी वेळ काढा. 

मोदींनी कथा सांगणाऱ्यांना आवाहन केलं की, स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत. आपल्या कथांमध्ये गुलामगिरीच्या काळातील प्रेरणा देणाऱ्या कथा आहेत. त्यांचा प्रचार  आपण करू शकतो. विशेषत: 1857 ते 1947 पर्यंतच्या कालखंडातील प्रत्येक लहान-मोठी गोष्ट. कोरोनाने आपल्याला एकत्र राहण्याचं महत्त्व शिकवलं असून या परिस्थितीत गोष्ट सांगण्याची कला शिका असंही मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mann ki baat pm modi say tell stories to story tellers