पर्रीकरांच्या उपस्थितीनेही कॉंग्रेसचा तीळपापड!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 एप्रिल 2017

कॉंग्रेसचा राज्यसभेतील गोव्यावरील गोंधळ ही पश्‍चातबुद्धी आहे. वेळ आली होती तेव्हा याच दिग्विजयसिंह यांना त्यांचे कॉंग्रेसचे आमदारच गोव्यात शोधत फिरत होते व हे मात्र गायब झाले होते.
- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा

राज्यसभेत दिग्विजयसिंह यांचे मानले "खास आभार'

नवी दिल्ली- कॉंग्रेसला जबरदस्त धोबीपछाड देऊन भाजपचे सरकार बनविणारे गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर पंधरवड्यानंतर आज अचानक काही मिनिटांसाठी राज्यसभेत प्रकटले आणि त्यांना नुसते पाहूनच कॉंग्रेस सदस्यांचा भडका उडाला. पर्रीकरांनीही, कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजयसिंह यांचे "खास आभार' मानून जखमेवर मीठ चोळले आणि कॉंग्रेसचा गोंधळ पुन्हा सुरू झाला.
"सकाळ'शी बोलताना, "गोव्यात भाजप सरकार बनल्यानंतर मी दिग्विजयसिंह यांचे खास आभार मानले,' असे पर्रीकरांनी नमूद केले आणि गोव्यात आपले सरकार पाच वर्षे कार्यकाळ निश्‍चित पूर्ण करेल, असे त्यांनी विश्‍वासाने सांगितले.

पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 14 मार्चला गोव्यात सरकार स्थापन केले. पर्रीकर यांनी त्या वेळी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी ते अजूनही राज्यसभेचे सदस्य आहेत. ते येथे उत्तर प्रदेशातून निवडून आले आहेत. आज राज्यसभेत दिग्विजयसिंह यांनी शून्य प्रहराच्या सुरवातीलाच गोव्याच्या राज्यपालांवर चर्चेची मागणी लावून धरली. मात्र, त्यांना कॉंग्रेस सदस्यांनीही साथ दिली नाही. शून्य प्रहर संपण्यास काही मिनिटे राहिली असताना पर्रीकर सभागृहात आले व मुख्तार अब्बास नक्वी यांच्या शेजारच्या आसनावर बसले. त्यांना नुसते पाहताच दिग्विजयसिंह व बी. के. हरिप्रसाद यांच्यासह कॉंग्रेस सदस्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर पर्रीकरांनी चेहऱ्यावर मिस्कील हसू आणत बोलण्यास सुरवात केली. गोंधळात त्यांचे बोलणे ऐकू आले नाही. या दरम्यान नक्वी यांनी दिग्विजयसिंह यांचे पर्रीकर आभार मानत आहेत, ते तरी ऐकून घ्या, असे कॉंग्रेस सदस्यांना डिवचले. त्यानंतर कॉंग्रेस सदस्य भडकून वेलमध्ये धावले व त्यांनी नेहमीप्रमाणे घोषणाबाजी सुरू केली. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी गोंधळ शांत केल्यावर कॉंग्रेसच्या रजनी पाटील या आपला विषय मांडण्यासाठी उठल्या तरी हरिप्रसाद यांचा आरडाओरडा सुरूच होता. त्यावर कुरियन यांनी, तुमच्याच पक्षाच्या व त्यादेखील महिला सदस्य बोलत आहेत, त्यांना तरी बोलू द्या, असे सुनावले. एवढ्यात राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. त्यावर पर्रीकर आले तसे शांतपणे बाहेर निघून गेले.

पंतप्रधानांची घेतली भेट
पर्रीकर यांनी आजच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. राज्यसभेत येण्यापूर्वी त्यांनी मोदी यांच्या संसदेतील दालनात त्यांची भेट घेतली. वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले. गोव्याने "जीएसटी' विधेयक यापूर्वीच मंजूर केले आहे. दिल्लीतील आजच्या बैठकीत राज्यांनी मंजूर करायच्या "जीएसटी' विधेयकावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यांच्या अर्थमंत्र्यांना मार्गदर्शन केले. पर्रीकर यांच्याकडे गोव्याचे अर्थमंत्रिपदही असल्याने त्यांनी आजच्या बैठकीला हजेरी लावली.

Web Title: manohar parrikar and congress