मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेला?

अवित बगळे
सोमवार, 5 मार्च 2018

पर्रीकर हे 15 फेब्रुवारीला मुंबईतील एका रुग्णालयात अचानक दाखल झाले होते. येथे स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार करण्यात आले होते. यानंतर गोव्यातही त्यांच्यावर उपचार झाले होते

पणजी (गोवा): मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती इस्पितळात आज (सोमवार) सायंकाळी दाखल होणार आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला नेण्याचा कुटुंबियांचा विचार आहे. मुख्यमंत्री राज्याबाहेर असताना प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे.

सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे समितीचे सदस्य राहतील. या समितीला ५ कोटी रूपयांपर्यंतच्या खर्चाला मंजूरी देण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. मंत्री ५० लाख रूपयांपर्यंतच्या खर्चाला मंजूरी देऊ शकतील.

आज संध्याकाळी मुंबईला रवाना होण्याचे निश्चित झाल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकाळपासून मंत्री आणि आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगांवकर, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी याबाबतची माहिती त्यांना दिली.

Web Title: manohar parrikar goa health