मुंबई - भाजपचे सरकार आता सत्तेवर येत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य मंत्री कार्यालये आणि मंत्रालयासमोरील मंत्री बंगल्यांवर सामानांची बांधाबांध सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला राजीनामा आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे संयुक्त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त झाले. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने गेल्या आठवड्यातच मंत्री कार्यालयातील साहित्य आणि मंत्री दालनांचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढले आहेत. या अनुषंगाने अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात संगणक, झेरॉक्स मशिन, टेलिफोन आणि साहित्य सामान्य प्रशासन विभागाकडे देण्याची लगबग सुरू आहे. ही कार्यवाही करण्यास भाजपच्या मंत्री कार्यालयातील कर्मचारी आघाडीवर आहेत. मात्र, नव्या सत्तेत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे वातावरण असल्याने शिवसेनेच्या मंत्री कार्यालयातील कर्मचारी अजूनही आशावादी आहेत.
फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने मंत्रालयातील सहाव्या मंजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात शुकशुकाट असून, उपस्थित असलेले कर्मचारी सामानाची बांधाबांध करीत आहेत. दुसरीकडे मंत्रालयासमोरील बंगल्यांमध्येही असेच चित्र आहे. या बंगल्यांमध्ये माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांचे वास्तव्य आहे. या ठिकाणीदेखील सामसूम आहे.
बंगल्यामंध्ये बसून असलेले कर्मचारी राजकीय घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बिघाडी होण्याच्या शक्यतेवर हे कर्मचारी अजूनही अशावादी असल्याचे त्यांच्या चर्चेवरून दिसून येते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.