आम्हीही भरपूर सर्जिकल स्ट्राईक केले होते; पण... : मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत देखील लष्कर कारवाई करु शकत होता. युपीए सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हते या आरोपाशी मी सहमत नाही. प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळं पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली : भाजपकडून लष्कराने पाकमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईक, एअर स्ट्राईकचा निवडणुकीत वापर होत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आमच्या सरकारच्या काळात अनेकवेळी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नसल्याचेही म्हटले आहे.

मनमोहनसिंग यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आर्थिक स्तरावर अपयशी ठरल्याची टीका केली आहे. ‘मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मनमोहनसिंग म्हणाले, की 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत देखील लष्कर कारवाई करु शकत होता. युपीए सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हते या आरोपाशी मी सहमत नाही. प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळं पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणण्याचाही भूमिका आम्ही घेतली होती. आम्हाला यामध्ये यशही मिळाले होते. मुंबई हल्ल्यानंतर 14 दिवसांच्या आत हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित कऱण्यात आले. युपीए सरकारने मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर अमेरिकेकडून 10 लाख डॉलर्सचं बक्षीसही जाहीर करुन घेतलं. फरक फक्त इतकाच आहे की आम्ही यासंबंधी कधी जाहीर केलं नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many surgical strikes during UPAs tenure says former Prime Minister Manmohan Singh