राजधानी दिल्लीत 20 ला "मराठा मोर्चा'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - राज्यात उत्स्फूर्त लोकसहभागाने गाजलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाने आता देशाच्या राजधानीत धडक देण्याचे ठरविले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. संयोजकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जंतरमंतरवर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला असून, उत्तर भारतातून मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यासाठी येतील, असे सांगण्यात आले आहे.

या मोर्चाचा राजकीय पक्ष वा नेत्यांशी काही संबंध नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चांना मिलालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील आगामी मोर्चाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संसदेचे अधिवेशन याचदरम्यान म्हणजे 16 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने या परिसरात सुरक्षेचे नियम कडक असतील. जंतरमंतरपासूनच कलम 144 लागू राहील व विशिष्ट मोर्चांचा अपवाद करतानाही 5000 च्या पेक्षा जास्त गर्दी जमवू नये, असे निर्देश त्या त्या आयोजकांना दिले जातील, असे सुरक्षा यंत्रणेने आधीच स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने संयोजकांनी सांगितले की, शांततेत निघणाऱ्या या मोर्चासाठी जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतून तसेच महाराष्ट्रातूनही अनेकांनी दिल्लीला येण्याची इच्छा दर्शविली आहे. दिल्लीत व्यवसायानिमित्त आलेल्या व येथे वर्षानुवर्षे स्थायिक झालेल्या मराठा बांधवांचा या मोर्चाच्या संयोजनात मुख्य सहभाग असेल. जंतरमंतर येथे हा मोर्चा आल्यावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व दिल्लीतील महाराष्ट्राचे निवासी आयुक्त यांना मोर्चाच्या वतीने निवेदन दिले जाईल. महाराष्ट्र सदनाच्या प्रशासनाने या संपूर्ण बिगर राजकीय मोर्चाच्या पूर्वतयारी बैठकीलाही राजकीय बैठक असे कारण देऊन परवानगी नाकारली होती.

दरम्यान, हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. यावेळी दिल्या जाणाऱ्या निवेदनात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (ऍट्रॉसिटी) दुरुपयोग नको, तसेच या कायद्यातील अनावश्‍यक जाचक तरतुदी रद्द करणे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करणे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करणे आदी मागण्यांचा समावेश असणार आहे.

Web Title: maratha kranti morcha in delhi