भोंदूबाबांच्या विरोधात आखाडा परिषदेचा 'शड्डू'

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

आसाराम, स्वामी असीमानंद, राम रहीमसह 14 बाबांचा यादीत समावेश
अलाहाबाद येथे अर्धकुंभमेळ्याच्या तयारीसाठी जमलेल्या आखाडा परिषदेच्या महंतांनी 14 नावांचा निर्णय घेतला आहे. आखाडा परिषदेने यापूर्वी वेळोवेळी अशा भोंदूंना विरोध केला आहे. सामान्यांची दिशाभूल आणि साधू महंतांची बदनामी टाळण्यासाठी हा निर्णय आवश्‍यक होताच. आखाड्याशी संबंधित मठ, मंदिर संस्थांना आखाडा परिषदेने निर्णय कळविला आहे.
- महंत भक्तीचरणदास, दक्षिणमुखी हनुमान मंदिर
 

नाशिक : अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील 14 बाबा भोंदू असल्याचे रविवारी जाहीर केले आहे. अलाहाबाद येथे आखाडा परिषदेच्या बैठकीनंतर परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिंरी यांनी ही चौदा नाव जाहीर केली. तसेच, आखाडा परिषद येत्या मंगळवारी (ता. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे.

अलाहाबाद येथे दुपारी आखाडा परिषदेच्या तेरा आखाड्यांची नरेंद्रगिंरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होउन 14 बाबांची नावे जाहीर करीत, आखाडा परिषदेने संबधित बाबा भोंदू असून, ते समाजात दिशाभूल करीत असल्याचे निवेदन काढले. यामध्ये आसाराम बापू ऊर्फ आशुमल शिरमलानी, व त्याचा पुत्र नारायण साई, सुखबिंदर कौर ऊर्फ राधे मॉं, सच्चिदानंद गिरी ऊर्फ सचिन दत्ता, गुरमीत राम रहीम सिंग, ओमबाबा ऊर्फ विवेकानंद झा, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंग, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, स्वामी असीमानंद, ओम नमः शिवाय बाबा, रामपाल, आचार्य कुशमुनी बृहस्पति गिरी, मलखान सिंह अशा 14 बाबांची नावे जाहीर केली आहेत.

संत पदवीबाबत चर्चा
विविध बाबा वेगवेगळ्या पदव्या लावून दिशाभूल करतात. त्याविषयी चर्चा झालेल्या या बैठकीत, आखाडा परिषदेने संत ही पदवीविषयी चर्चा झाली. संत ही अखिल भारतीय आखाडा परिषदेने 'संत' ही पदवी देण्याची प्रक्रिया निश्‍चित केली जाणार आहे. आखाडा परिषदेने वेळोवेळी विविध कुंभमेळ्यांमध्ये अशा भोंदूंना विरोध केला आहे. यापुढे भोंदूकडून होणारी संत महंताची व तमाम साधू समाजाची बदनामी टाळण्यासाठी संत पदवी प्रदानाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: marathi news baba ram rahim fake gurus on hit list