लालूंना आवडेना तुरुंगातील जेवण 

File photo of Lalu Prasad Yadav
File photo of Lalu Prasad Yadav

पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लालूंना या तुरुंगातील जेवण आवडत नसल्याने त्यांचा कोंडमारा होऊ लागला आहे. लालू आता एकतर स्वतःच्या हाताने जेवण बनवितात किंवा त्यांना नातेवाइकांकडून डबा येतो, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लालूंना सध्या रांचीतील तुरुंगामध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना रोज शेकडो कार्यकर्ते भेटण्यासाठी येत असल्याने पोलिसांचीही तारांबळ उडू लागली आहे. 

तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार एखाद्या कैद्यास एका दिवशी केवळ तीनच व्यक्ती भेटू शकतात; पण लालूंच्या समर्थकांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पोलिसांचीही पंचाईत झाली आहे. अनेकांची समजूत घालताना पोलिसांच्या नाकीनऊ येऊ लागले आहेत. मोकळा वेळ मिळताच लालू तुरुंगातील खानावळीमध्ये येऊन जेवण बनवून घेतात. येथील आचाऱ्यालाही त्यांनी काढून टाकले आहे. तुरुंगामध्ये लालूंना टीव्ही पाहण्याची आणि वर्तमानपत्र वाचण्याची मुभा देण्यात आली आहे. लालूंना येथे आणल्यापासून तुरुंगाच्या बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. 

राज्यातील कंसांना वाटते, की लालूंना तुरुंगात टाकल्याने त्यांना आरामात राहता येईल. पण बिहारमधील जनता हे होऊ देणार नाही. लालू हे गरीब जनतेचा आवाज आहेत. 
- तेजस्वी यादव, लालूप्रसाद यांचे पुत्र 

न्याय रथयात्रा निघणार 
लालूंवरील आरोपांबाबत माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंह म्हणाले, ""मध्यंतरी माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन सोनिया गांधींवर टीका केली होती. यामुळे मिश्र यातून सुटले. लालू आणि त्यांच्यावर एकाच प्रकारचे आरोप होते.'' येत्या 6 जानेवारी रोजी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यामध्ये पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. लालूंच्या समर्थनार्थ "राजद' न्याय रथ यात्रा काढण्याच्या विचारात असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com