भारताचा पाया सशक्त करणारा अर्थसंकल्प 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पंतप्रधान - तरतुदी घराघरांत पोचविण्याचे आवाहन 

पंतप्रधान - तरतुदी घराघरांत पोचविण्याचे आवाहन 

नवी दिल्ली - "अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आज मांडलेला अर्थसंकल्प "न्यू इंडिया' म्हणजेच नव भारताचा पाया सशक्त करणारा आहे. देशाच्या सव्वाशे कोटी जनतेच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणाऱ्या व समाजच्या प्रत्येक घटकासठी काही ना काही देणाऱ्या या अर्थसंकल्पाबद्दल जेटली व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन,'' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्र्यांची पाठ थोपटली. सायंकाळी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीतही मोदींनी अर्थसंकल्पाचे तोंड भरून कौतुक केले. यातील तरतुदी घराघरांत पोचवा, असेही त्यांनी सत्तारूढ खासदारांना सांगितले. 

अर्थसंकल्प लोकसभेत सादर झाल्यावर काही वेळातच मोदी यांनी दूरदर्शनद्वारे "मन की बात' सांगून अर्थसंकल्पावर दीर्घ संबोधन केले. यातील प्रत्येक तरतुदीबाबतही त्यांनी माहिती दिली. मोदी म्हणाले, की अर्थसंकल्पी तरतुदींमुळे गरिबांची "हेल्थ व वेल्थ' या दोन्हींचीही परिस्थिती सुधारेल. कृषी क्षेत्रासाठी यात ऐतिहासिक तरतुदी असून, व्यापार-व्यवसाय करणेही आणखी सुलभ होणार आहे. 

"अमूल'चा नावलौकिक जगभरात पसरल्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ""शेतकऱ्यांसाठी 14 लाख कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे. "ऑपरेशन ग्रीन' ही योजना दीर्घकालीन फायद्याची असून, शीतगृहापासून मालवाहतुकीपर्यंतच्या सुविधांचे जाळे मजबूत झाल्यानंतर फळे, भाजीपाला, कांद्यासारखी कृषी उत्पादने यांच्यामुळे शेतकऱ्यांना फक्त फायदाच मिळेल. शेतकऱ्यांना किमान हमीभाव दीडपट करण्यात येणार आहे. सहकारी संस्थांना प्राप्तिकरातून सवलत मिळेल. पंतप्रधान ग्रामीण रस्ता योजनेत गावागावापर्यंत रस्त्याचे मजबूत जाळे उभारण्यात येईल.'' 

""आयुष्यमान भव ही नवी योजनाही क्रांतिकारी आहे. याचा लाभ सुमारे 50 कोटी गरिबांना मिळेल. दर तीन लोकसभा मतदारसंघांमागे व प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागांत वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होईल. कोट्यवधी भारतीयांच्या आकांक्षांना मूर्त रूप देणारा, मेक इन इंडियाला नवी ताकद देणारा, पुढच्या पिढीसाठी अनेक संधींची दारे उघडणारा, रोजगारांच्या संख्येत भरीव वाढीची शक्‍यता असलेला हा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे,'' असेही मोदींनी नमूद केले. 

Web Title: marathi news budget 2018 union budget arun jaitley narendra modi