'थलैवा'चा राजकारण प्रवेश रविवारी? 

पीटीआय
बुधवार, 27 डिसेंबर 2017

चेन्नई : राजकारणातील प्रवेशाबाबत मी माझी भूमिका 31 डिसेंबर (रविवारी) रोजी जाहीर करणार आहे, अशी घोषणा करत 'सुपरस्टार' रजनीकांत यांनी आज आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले अभिनेते रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची त्यांच्या समर्थकांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता 31 डिसेंबर रोजी संपणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

रजनीकांत यांच्यासोबत त्यांचे चाहते आजपासून पुढील काही दिवस छायाचित्रे काढून घेऊ शकणार आहेत. त्यासाठी सहा दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलताना रजनीकांत यांनी वरील माहिती दिली.

ते म्हणाले, ''मी राजकारणात प्रवेश करणार आहे, असे म्हणणार नाही. मात्र, राजकारणातील प्रवेशाबाबत माझी भूमिका 31 डिसेंबर रोजी मी जाहीर करणार आहे.'' 
''राजकारणातील खाचाखोचा मला चांगल्याच माहीत आहेत. त्यामुळे मी राजकारणातील प्रवेशाबद्दल द्विधा मनस्थितीत होतो. असे असले तरी राजकारण माझ्यासाठी नवे नाही,'' असे रजनीकांत म्हणाले. 1996 मध्ये तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या विरोधात ठोस भूमिका घेतली होती, याची आठवणही रजनीकांत यांनी या वेळी सांगितले. पांढरी दाढी, डोळ्यांवर चष्मा आणि पांढऱ्या वेशात असलेल्या तमिळ चित्रपटसृष्टीच्या या 'सुपरस्टार' अभिनेत्याने अतिशय सहज आणि सोफ्या तमीळ भाषेत चाहत्यांशी संवाद साधला. 

''युद्ध हे जिंकण्यासाठीच लढायचे असते. त्यामुळे मी जेव्हा युद्धात उतरेन त्या वेळी पूर्ण तयारीनिशीच उतरेन. राजकारणात फक्त धाडस, शौर्य असून चालत नाही, तर तुमची धोरणेही महत्त्वाची असतात,'' असे रजनीकांत म्हणाले. आपल्या चाहत्यांनी संयम बाळगावा आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक विचार प्रसारित करण्यात येतात. त्यामुळे सदैव सकारात्मक विचारांवर ध्यान केंद्रित करा, असेही ते म्हणाले. 

रजनीकांत यांचे मित्र प्रसिद्ध तमीळ अभिनेते कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला आहे. हसन यांच्या पावलावर पाऊल टाकत 'थलैवा' म्हणून ओळखले जाणारे रजनीकांतही राजकारणाच्या आखाड्यात उतरतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

Web Title: marathi news Chennai Tamilnadu Politics Rajinikanth in Politics