पालघरचे खासदार अॅड. चिंतामण वणगा यांचे दिल्लीत निधन

प्रमोद पाटील 
मंगळवार, 30 जानेवारी 2018

दिल्ली : पालघरचे लोकप्रिय खासदार अॅड. चिंतामण वणगा यांचे आज दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

दिल्ली : पालघरचे लोकप्रिय खासदार अॅड. चिंतामण वणगा यांचे आज दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

राजकरणातील संत माणूस असलेले वणगा यांच्या जाण्याने पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 3 वेळा खासदार आणि 1 वेळा आमदार व पालघर जिल्ह्यातील भाजपचा चेहरा असलेले वणगा 1990 ते 1996 या काळात भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते. 11व्या लोकसभेमध्ये 1996 साली सर्वप्रथम खासदार झाले. 1998 च्या 12व्या लोकसभेसाठी झालेल्या मुदतपूर्व निवडणूकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा 1999च्या 13 व्या लोकसभा निवडणूकीत वणगा विजयी झाले. 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणूकीत ते पराभूत झाले. यानंतर त्यांनी 2009 साली विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व आमदार झाले. 

2014 सालच्या निवडणूकीत आमदार असतानाच पुन्हा लोकसभा निवडणूक लढविली व खासदार झाले. लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ओळखले जायचे. पेशाने वकील असलेल्या वनगा यांनी आपल्या वकीलीकड़े कधी व्यवसाय म्हणून न पाहता वकीली हे जनसेवेचे साधन म्हणून वापरले. असंख्य गोर-गरीब जनतेचे खटले त्यांनी मोफत चालविले. 

वणगा साहेबांच्या व माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात एकत्र सुरु झाली. खांद्याला खांदा लावून आम्ही अनेक वर्ष संघर्ष करत आम्ही इथपर्यंत पोहचलो मात्र आमची साथ अर्थवट सोडून आमचा साथीदार गेल्याचे आम्हाला अतीव दुःख आहे. पक्षाची भरून न येणारी हानी झाली असून पालघर जिल्ह्याची जनता पोरकी झाली आहे. ग्रामीण - दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांसाठीसाठी सदैव जागरूक असणारा लोकप्रतिनिधि आपण गमावला असून आपल्यावर असणारे भावाचं छत्र हरपल्याची शोकाकुल प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णु सवरा यांनी व्यक्त केली आहे. आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वेचणाऱ्या, जनतेप्रती आपली कायम बांधिलकी जपणाऱ्या, जनतेच्या प्रश्नांसाठी संवेदनशील असणाऱ्या, एका लढवय्या लोकनेत्याला नामदार सवरा यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे. 

दरम्यान दिल्लीहुन त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणण्यात येईल. अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव उद्या (बुधवारी) सकाळी 7 ते 12 पर्यंत तलासरी येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांचा अंत्यविधी तलासरी येथेच होणार आहे.
 

 

Web Title: Marathi news delhi news chintaman wanga expire palghar