लष्करी जवानाला भररस्त्यात मारहाण, शिविगाळ करणाऱया महिलेला अटक

टीम ई सकाळ
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

घटनेचे शुटिंग सुभेदार यांनी पोलिसांकडे 13 सप्टेंबरला सुपूर्त केले. कार्ला यांना गुरूग्राममधून अटक करण्यात आली. त्यांची कारही जप्त करण्यात आली. कार्ला या होम सायन्समध्ये पदवीधर आहेत. 1995 मध्ये त्यांचा लष्करातील अधिकाऱयाच्या मुलाशी विवाह झालेला होता. 2008 मध्ये काही कारणांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. त्या घटस्फोटिता आहेत. 

नवी दिल्ली : लष्कराच्या जवानाला भर रस्त्यात थोबाडीत मारणाऱया आणि शिविगाळ करणाऱया दिल्लीच्या 44 वर्षे वयाच्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संबंधित महिला रस्त्यात जवानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांत इंटरनेटवर व्हायरल झाला होता. सीमेवर लढणाऱया जवानांप्रती विलक्षण असंवेदनशील वागणाऱया या महिलेबद्दल व्हिडिओ पाहून लाखो लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

स्मृती कार्ला असे या महिलेचे नाव आहे. महानगर न्यायदंडाधिकाऱयांनी तिची जामिनावर सुटका केली आहे. नऊ सप्टेंबरला दक्षिण दिल्लीत वसंत कुंज परिसरात घडलेल्या या घटनेची तक्रार 13 सप्टेंबरला दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध करून महिलेला अटक केली. 

लष्करातील सुभेदारपदावरील व्यक्तीने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहेल. सुभेदार आपल्या पाच सहकाऱयांना हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी लष्कराच्या ट्रकमधून निघाले होते. राजोक्री उड्डाणपुलाजवळ इंडिका कार चालणाऱया स्मृती कार्ला यांनी लष्कराच्या ट्रकला ओव्हरटेक केले. त्यानंतर कार्ला यांनी कार वाकडी-तिकडी नेली आणि ट्रकला पुढे जाण्यापासून रोखले. ट्रकच्या मागे वाहनांची गर्दी वाढून रस्ता जवळपास रोखला गेला. कार्ला यांनी कार थांबवल्यावर ट्रकचा चालक उतरून कार्ला यांच्याकडे विचारणा करू लागताच कार्ला यांनी त्याची कॉलर पकडून थोबाडीत लगावण्यास सुरूवात केली. 

कार्ला यांच्या वर्तनाने धक्का बसलेला कॉन्स्टेबल दर्जाचा हा चालक ट्रकमध्ये परत येऊन बसला. मात्र, कार्ला यांनी प्रकरण तितक्यावरच न थांबवता ट्रकच्या खिडकीवर बुक्क्या मारण्यास सुरूवात केली. त्यांनी आतमध्ये बसलेल्या सुभेदारांसह इतरांना शिविगाळही केली, असे तक्रारीत म्हटले आहे. 

सुभेदार यांच्या दाव्यानुसार, त्यांनी कार्ला यांना त्यांच्या वागण्याचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला. सुभेदार ट्रकमधून उतरून त्यांच्याशी बोलण्यासाठी येऊ लागताच कार्ला यांनी त्यांनाही थोबाडीत मारल्या आणि शिविगाळ केली. 

या घटनेचे काही लोकांनी व्हिडिओ शुटिंग केले. सुभेदार यांनीही आपल्या सहकाऱयांना व्हिडिओ शुटिंग करण्यास सांगितले. प्रकरण हाताबाहेर चालले आहे, असे दिसताच कार्ला यांनी माघार घेत कारमध्ये बसून पलायन केले. 

तेरा सप्टेंबरला हे शुटिंग सुभेदार यांनी पोलिसांकडे सुपूर्त केले. कार्ला यांना गुरूग्राममधून अटक करण्यात आली. त्यांची कारही जप्त करण्यात आली. कार्ला या होम सायन्समध्ये पदवीधर आहेत. 1995 मध्ये त्यांचा लष्करातील अधिकाऱयाच्या मुलाशी विवाह झालेला होता. 2008 मध्ये काही कारणांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. त्या घटस्फोटिता आहेत. 

Web Title: Marathi news Gurugram woman arrested for slapping, abusing army man