बौद्धीक क्षमतेसोबतच अधिकारी संवेदनशीलही असावा - राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा

अवित बगळे 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

देशभरातील लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या 20 व्या राष्ट्रीय परीषदेचे उद्‌घाटन पार पडले. या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड शॅमले, स्थायी समितीचे अध्यक्ष घंटा चक्रपाणि, गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा हे उपस्थित होते. 

पणजी (गोवा) - सरकारी सेवेसाठी अधिकारी निवडताना भाषा प्रभुत्व, बौद्धीक क्षमता आदी परीक्षेतून तपासता येईल. मात्र त्याच्या हृदयात संवेदना आणि ममत्व आहे का हेही तपासले पाहिजे. तरच समाजासाठी तो अधिकारी उपयुक्त ठरेल, असे मत गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी आज येथे व्यक्त केले. देशभरातील लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या 20 व्या राष्ट्रीय परीषदेचे उद्‌घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड शॅमले, स्थायी समितीचे अध्यक्ष घंटा चक्रपाणि, गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा हे होते. 

राज्यपाल म्हणाल्या, समाजकल्याण बहुंशी अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. त्यामुळे योग्य त्या अधिकाऱ्यांची निवड करण्याचे आव्हान लोकसेवा आयोगासमोर नेहमीच असते. त्यासाठी परीक्षाही घेतल्या जातात. मात्र समाजासाठी काम करण्यासाठी हृदयात कणव असावी लागते. तसा उमेदवारच समाजासाठी मनापासून काम करत राहतो आणि तशा अधिकाऱ्यांचीच आज गरज आहे. गुणवत्तेवर आधारीत निवडी झाल्या पाहिजेत पण त्याचसोबत हृदयात संवेदना आहे का आणि ते ममतेने ओतप्रोत भरलेले आहे का हेही तपासले पाहिजे. सिमले म्हणाले, बदलत्या जागतिक आर्थिक व समाजिक परीस्थितीत सरकारच्या संपदांचा समाजासाठी उपयोग करण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड करण्याचे आव्हान लोकसेवा आयोगांसमोर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्याबाबतीत काही पथदर्शी असे निर्णय घेतले आहेत. एकतर अभ्यासक्रमांत सातत्याने सुधारणा करून योग्य मनुष्यबळ निवडले जाईल, याची काळजी घेण्यात येते.

परीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमरही लावण्यात येत आहेत. उमेदवार निवडीतील लवचिकता हेही एक वैशिष्ट्य आहे. 
चक्रपाणि यांनी देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निवृत्ती वय आणि एक समान निवृत्तीवेतन लागू करण्याचा प्रश्‍न असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, यादिशेने प्रयत्न सुरु आहेत. काल रात्री मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशीही याविषयावर चर्चा झाली आहे. हा प्रश्‍न सोडविण्यात त्यांची मदत होऊ शकते. देशभरातील लोकसेवा आयोगांसाठी एकसारखी परीक्षा पद्धती लागू करणे, निवडीसंदर्भातील नियमांचे प्रमाणीकरण करणे आदी कामे करावी लागणार आहेत. यासाठी सुखराम चटर्जी अहवालाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. मुलाखत तंत्र विकसित करण्यासाठी वर्षांतून दोन वेळा प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. दीपप्रज्वलनाने या परिषदेचे उद्‌घाटन झाले. जुझे मान्युएल नरोन्हा यांनी प्रास्ताविक केले. आयोगाचे सदस्य सचिव अमेय अभ्यंकर यांनी स्वागत केले व आभार मानले.

Web Title: marathi news Inauguration of public service Commission event in goa