पीओकेतील 'सर्जिकल स्ट्राईक'साठी 15 महिने तयारी : पर्रीकर

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

त्या पत्रकाराने विचारले, 'अशाच प्रकारची कारवाई पश्‍चिम आघाडीवरही करण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यात आहे का? मी हा कार्यक्रम पाहत होतो आणि 'योग्य वेळी या प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे' असे तेव्हाच ठरविले,

पणजी : पाकिस्तानी लष्कराला हादरवून टाकणाऱ्या पाक व्याप्त काश्मीरमधील (पीओके) भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'च्या नियोजनाची सुरवात कधी झाली ठाऊक आहे? तारीख आहे 9 जून, 2015! त्या वेळी संरक्षणमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांनीच ही गोपनीय माहिती आता जाहीर केली आहे. भारतीय लष्कराची ताकद आणि मारक क्षमता दाखवून देणाऱ्या त्या 'सर्जिकल स्ट्राईक'साठी तब्बल 15 महिने पूर्वतयारी सुरू होती. 

विशेष म्हणजे, एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राज्यवर्धनसिंह राठोड यांना 'लाईव्ह' कार्यक्रमात अपमानास्पद प्रश्‍न विचारल्याने निर्माण झालेल्या संतापातून या मोहिमेच्या नियोजनाची सुरवात झाली. खुद्द पर्रीकर यांनीच ही माहिती काल (शुक्रवार) एका कार्यक्रमात दिली. 

ईशान्य भारतातील एका दहशतवादी गटाने 5 जून 2015 रोजी मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात 18 जवान हुतात्मा झाले होते. 'हा हल्ला अपमानास्पद होता. एखाद्या दहशतवादी संघटनेमुळे आमच्या लष्कराचे 18 जवान हुतात्मा झाले. हा भारतीय लष्कराचा अपमान होता. त्याच दिवशी दुपारी आम्ही बैठक बोलाविली होती आणि संध्याकाळी पहिल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चे नियोजन केले. भारत-म्यानमार सीमेनजीक असलेल्या त्या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करण्याचे नियोजन होते. 8 जून रोजी 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आला आणि त्यात 70 ते 80 दहशतवादी ठार झाले. यात भारतीय लष्कराचे कोणतेही नुकसान झाले नाही. हा हल्ला यशस्वी ठरला होता. पण यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांच्या एका प्रश्‍नाने मी दुखावला गेलो. लष्कराचे माजी अधिकारी आणि केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात होते. लष्कराच्या विविध 'सर्च ऑपरेशन्स'विषयी ते माहिती देत होते. त्यावेळी त्या पत्रकाराने विचारले, 'अशाच प्रकारची कारवाई पश्‍चिम आघाडीवरही करण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यात आहे का? मी हा कार्यक्रम पाहत होतो आणि 'योग्य वेळी या प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे' असे तेव्हाच ठरविले,' असे पर्रीकर यांनी सांगितले. 

'9 जून 2015 पासून या मोहिमेच्या आखणीची सुरवात झाली. प्रत्यक्ष 'सर्जिकल स्ट्राईक' 29 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 15 महिने याची तयारी सुरू होती. प्रत्यक्ष कामगिरीवर गेलेल्या तुकडीपेक्षाही अतिरिक्त जवान आम्ही सज्ज ठेवले होते. या हल्ल्यासाठी लागणारी शस्त्रास्रे प्राधान्याने विकत घेण्यात आली. 'डीआरडीओ'ने विकसित केलेल्या 'स्वाती वेपन लोकेटिंग रडार'चाही यासाठी वापर करण्यात आला. याद्वारे पाकिस्तानची 'फायरिंग युनिट्‌स' कुठे आहेत, हे आम्ही नोंदवून घेतले. मुख्य म्हणजे, या हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी 'स्वाती रडार'चा लष्करात अधिकृतरित्या समावेश करण्यात आला. याच रडारच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीमुळे पाकिस्तानी लष्कराची चाळीस 'फायरिंग युनिट्‌स' उध्वस्त करण्यात आली,' असेही पर्रीकर यांनी सांगितले.

Web Title: marathi news Indian Army Surgical Strike PoK Pakistan Manohar Parrikar