कुलभूषण जाधवांचे अपहरण केले ; बलूच नेत्याचा दावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून इराणमधील चाबहार येथून अपहरण करण्यात आले.

- मामा कदीर, बलूच नेते

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून इराणमधील चाबहार येथून अपहरण करण्यात आले होते, असा दावा बलूच नेते मामा कदीर यांनी केला. 

कुलभूषण जाधव हे गेल्या अनेक महिन्यांपासून हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात शिक्षा भोगत आहेत. त्यांना पाकिस्तानात चांगली वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता त्यांच्या अटकेबाबत नवी माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांचे पाकिस्तानी आयएसआयच्या इशाऱ्यावरून इराणमधील चाबरार येथून अपहरण करण्यात आले होते, असा दावा कदीर याने केला. कदीर यांने याबाबतचा दावा एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 'व्हाईस फॉर मिसिंग बलूच' या संघटनेकडून याबाबत माहिती मिळाल्याचे कदीरने सांगितले.  

याबाबत कदीरने सांगितले, की ''आमचे संयोजक तेथे उपस्थित होते. जाधव यांच्या अपहरणासाठी आयएसआयकडून मुल्ला उमरला कोट्यवधी रूपये देण्यात आले होते. मुल्ला उमर हा आयएसआयचा एजंट म्हणून कुख्यात असून, पाकिस्तान सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांचे अपहरण करणारा आयएसआयचा एजंट म्हणून ओळखला जातो''.  

Web Title: Marathi News International baloch leader says isi paid mullah omar crores rupees kidnap kulbhushan jadhav iran