बेळगावात अनधिकृत शीतगृहांचे प्रकरण तापले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

ऑटोनगर येथील शीतगृहांचे प्रकरण गेले दोन दिवस चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार अंगडी यांनी थेट आमदार सेठ यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बेळगाव - ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू व पुत्र पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यांनी बुधवारी (ता. 28) पत्रकार परीषदेत केला. अनधिकृत शीतगृहे टक्केवारीवर सुरु आहेत. त्यात आमदार व त्यांचा बंधूची भागीदारी आहे, असेही खासदार अंगडी म्हणाले. कर्नाटक पोलिस व गृहखाते या शीतगृहांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्रीयल गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे तसेच संसदेत हा विषय उपस्थित करणार असल्याचे अंगडी यांनी सांगितले. 

ऑटोनगर येथील शीतगृहांचे प्रकरण गेले दोन दिवस चर्चेत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार अंगडी यांनी थेट आमदार सेठ यांच्यावर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याकडेही या शीतगृहांबाबत तक्रार करणार असल्याचे अंगडी म्हणाले. ते पुढे म्हणाले, 'गतवर्षी जिल्हा पंचायतीच्या बैठकीत आपण हा विषय उपस्थित केला होता. महापालिका, औद्योगिक विकास मंडळ किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नसताना शीतगृहे चालविली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. पण वर्षभरात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. तक्रारदार अॅड. हर्षवर्धन पाटील, प्राणिदया संघटनेचे बंगळूर येथील पदाधिकाऱ्यांना शीतगृहात प्रवेश करण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. आमदार सेठ, त्यांचे बंधू व पुत्र तक्रार घेवू नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत. शिवाय शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. बंगळूरचे आमदार हारीस यांच्यापेक्षा आमदार सेठ यांचे कृत्य गंभीर आहे. 

या शीतगृहांबाबत औद्योगिक विकास मंडळाकडून माहिती मागितली तर त्यांनी विसंगत माहिती दिली आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा संशय आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. उलट पोलिस अनधिकृत शीतगृहांना संरक्षण देत आहेत. तेथील शीतगृहांमध्ये असलेल्या मांसाचा पंचनामा करण्यात पोलिसांनी अडथळे आणले. दोन शीतगृहांमध्ये अद्याप पंचनामा झालेला नाही. गेले दोन दिवस हे प्रकरण चर्चेत असताना पोलिसांकडून मात्र चौकशीच केली जात नाही. या प्रकरणातील तक्रारदार हर्षवर्धन पाटील याना पोलिसांकडून धमकी दिली जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून बेळगावचे पोलिस आमदार सेठ यांच्या हातचे बाहुले बनले आहे. या संदर्भात तातडीने कारवाई झाली नाही तर भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुणी, हर्षवर्धन पाटील, किरण जाधव, अनिल बेनके, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी उपस्थित होते.   

Web Title: marathi news karnataka belgaon illegal cold storage shops