रेणुका मंदिर सौंदत्ती यात्रेची तयारी पुर्ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

बेळगाव - हेस्कॉमकडून होणारा वीजपुरवठा जरी खंडित झाला तरीही सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर जनरेटरच्या सहाय्याने रात्रीच्या वेळेस झगमगाट राहणार आहे. भाविकांची तहान मिटविण्यासाठी जनरेटरचा यंदा प्रथमच आधार घेण्यात आला आहे. शाखंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने यंदा भाविकांसाठी मुलभूत सुविधा देण्यावर सौंदत्ती मंदिर देवस्थान ट्रस्टने भर दिला आहे. 

बेळगाव - हेस्कॉमकडून होणारा वीजपुरवठा जरी खंडित झाला तरीही सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर जनरेटरच्या सहाय्याने रात्रीच्या वेळेस झगमगाट राहणार आहे. भाविकांची तहान मिटविण्यासाठी जनरेटरचा यंदा प्रथमच आधार घेण्यात आला आहे. शाखंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने यंदा भाविकांसाठी मुलभूत सुविधा देण्यावर सौंदत्ती मंदिर देवस्थान ट्रस्टने भर दिला आहे. 

2 जानेवारीपासून सौंदत्ती यात्रेला सुरवात होत असून सौंदत्ती डोंगरावर यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. भाविक रेणुका देवीचे (यल्लम्मा) दर्शन घेण्यासाठी आतापासूनच डोंगरावर येत असून मुख्य यात्रा 2 जानेवरी रोजी होणार आहे. दरम्यान यात्रेनंतरही सुमारे महिना भर बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील भाविक देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीला जातात. पौर्णिमेच्या दिवशी मुख्य यात्रा असून सुमारे तीन ते चार लाख देवीचे दर्शन घेतील, असा मंदिर व्यवस्थापनाचा अंदाज आहे. यादृष्टीने याठिकाणी भाविकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागील महिनाभरापूर्वीपासूनच विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. 

सौंदत्ती डोंगरावर मागील वर्षीपासून सीसीटीव्हीची भाविकांवर नजर असून यंदाही सुमारे 21 हून अधिक सीसीटीव्ही डोंगराच्या विविध भागात बसविण्यात आले आहेत. यासह मंदिर आवारात कायमस्वरुपी सीसीटीव्ही यापूर्वीपासूनच कार्यान्वित आहेत. देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक गाव पातळीवर समुह करून डोंगरावर येतात. सुमारे दोन ते दिवस दिवस प्रत्येक गावचे लोक समुहाने डोंगरावर विविध ठिकाणी आपले बिऱ्हाड मांडतात. डोंगरावरील उंचीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात होणारी अडचण ओळखून डोंगरावरील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारे भाविकांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. 1 जानेवारीलाच मुख्य यात्रेसाठी भाविक डोंगरावर दाखल होणार असून 2 जानेवारीला यात्रेत सहभागी होणार आहेत. मात्र अनेक गावांनी आतापासूनच डोंगरावर देवीच्या दर्शनासाठी गर्दी करण्यात सुरवात केली आहे. यात्रेनंतरही भाविक महिनाभर देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. येथील रेणुका मंदिरचे सीईओ एस. सी. कोटारगस्ती यांनी, भाविकांना आवश्‍यक असणाऱ्या सर्वच मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला जात आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास डोंगरावर काळोख पसरत होता. तर पाणी पुरवठ्यातही व्यत्यय येई. ही अडचण दूर करण्यासाठी यंदा प्रथमच जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे, अशी माहिती दिली. 

सुविधांमध्ये वाढ -
-जनरेटरद्वारे विज आणि पाणी पुरवठा सौंदत्ती डोंगरावर प्रथमच होणार. 
-डोंगरावर सीसीटीव्हीची नजर, चोरी व अनुचित घटनांना चाप बसेल. 
-आरोग्य खात्याचे तात्पुरते केंद्र यापूर्वी केवळ मंदिर परिसरात थाटले जात   होते. 
-यंदा डोंगरावरील प्रमुख इतर ठिकाणीही थाटणार.
-डोंगरावर होणारा कचरा उचल करण्यासाठी 80 हून अधिक स्वच्छता   कर्मचाऱ्यांची नियुक्ती. 
-डोंगरावरील उंचीच्या ठिकाणी टँकरद्वारे होणार पाणी पुरवठा. 
 

Web Title: Marathi News Karnataka News goddess Renuka Saundati yatra