कार्ती चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी

पीटीआय
सोमवार, 12 मार्च 2018

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची 24 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची 24 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी आणखी कोठडीची आवश्‍यकता नसल्याचे नमूद केल्यानंतर विशेष न्यायाधीश सुनील राणा यांनी हा निर्णय दिला. तिहार कारागृहात स्वतंत्र कक्ष आणि संरक्षण मिळावे अशी मागणी करणाऱ्या कार्ती यांच्या याचिकेवर न्यायालयाने कारागृहाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे कार्ती यांच्या जामीन अर्जावर 15 मार्चला सुनावणी होईल, असेही सांगण्यात आले. न्यायालयाने कार्ती यांची कारागृहात घरी बनविलेले अन्न देण्याची विनंतीही फेटाळली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आले असून, त्यांना 12 दिवस पोलिस कोठडीत राहावे लागले आहे. आजच्या सुनावणीच्या वेळी पी. चिदंबरमही न्यायालयात उपस्थित होते. 

दरम्यान, विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर कार्ती चिदंबरम यांनी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या याचिकेवर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे.

Web Title: marathi news Karti Chidambaram INX Media scam