'कोरेगाव भीमा'मागे संघ-भाजपचा हात; राज्यसभेत विरोधकांचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नवी दिल्ली : कोरेगाव भीमातील घटनेचे अतिशय संतप्त पडसाद आज संसदेत उमटले. राज्यसभेत सर्व विरोधकांनी या हिंसाचारामागे संघ व भाजपचा थेट हात व चिथावणी असल्याचा आरोप करून दुपारी तीनपर्यंत कामकाज रोखले.

नवी दिल्ली : कोरेगाव भीमातील घटनेचे अतिशय संतप्त पडसाद आज संसदेत उमटले. राज्यसभेत सर्व विरोधकांनी या हिंसाचारामागे संघ व भाजपचा थेट हात व चिथावणी असल्याचा आरोप करून दुपारी तीनपर्यंत कामकाज रोखले.

राज्यसभेत दलितांवरील अत्याचाराचा विषय मांडू न दिल्याबद्दल व दूरचित्रवाणीवरून या गोंदळाचे चित्रीकरणही थांबविल्याबद्दल काँग्रेसने टीकेची झोड उठविली. हे असे करून सरकारने जनतेच्या आवाजाची मुस्कटदाबी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला; मात्र कोरेगाव भीमा व पुण्यात काही नेत्यांची संघटितपणे हिंसाचार भडकावण्याची कृती व त्यांची भाषणे दिली ती विरोधी नेत्यांनी जरूर पाहावीत, असे सभागृहनेते अरुण जेटली यांनी सांगताच काँग्रेसच्या बाकांवर सन्नाटा पसरला. 

राज्यसभेत आज तोंडी तलाकबंदीचे विधेयक येणार असल्याने उत्सुकता होती; मात्र कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या रजनी पाटील, बसपचे सतीश मिश्रा यांनी कोरेगाव भीमातील घटना व महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचाराचा विषय मांडण्यास परवानगी मागितली. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी ती नाकारताच गोंधळ सुरू झाला. यामुळे सकाळी 11, दुपारी 12 व दुपारी दोन असे तीनदा कामकाज तहकूब करण्यात आले.

आझाद म्हणाले, की भाजप सरकार आल्यावर गेली साडेतीन वर्षे देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत व त्याला भाजप आणि परिवाराची फूस आहे. हरियाना, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यांतील दलित भयभीत आहेत. राज्यसभाध्यक्षांवर टीका करण्याचे टाळून ते म्हणाले, की दलित, मुस्लिम शेतकरी, महिला यांच्यावरील अन्यायाला संसदेत वाचा फोडण्याचे काम लोकप्रतिनिधी करतात; मात्र राज्यसभेत त्यांना बोलूच न देणे व दूरचित्रवाणी प्रक्षेपणही बंद करणे हे अत्यांत खेदजनक असून, देशाच्या लोकशाही इतिहासात असे प्रकार संसदेत कधी घडलेले नव्हते ते राज्यसभेत आता सुरू झाले आहेत. 

समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी दलित जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र सरकारने परिस्थिती संयमाने हाताळल्याचे सांगून ते म्हणाले, की मी स्वतः 31 डिसेंबरला कोरेगाव भीमा येथे सभा घेतली. या हिंसाचाराला दलित नेते जिग्नेश मेवानी जबाबदार आहेत. या सरकारच्या म्हणण्याशी मात्र आठवले यांनी असहमती दर्शविली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले, की महाराष्ट्रात दलित व सवर्ण समाज कायम एकोप्याने राहत आला आहे. देशभरात विशेषतः भाजपशासित राज्यांत विकासाचा रथ रोखण्यासाठी दंगली पेटविण्याचे जे सुनियोजित कारस्थान सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रातील घटना होय, असेही त्यांनी सांगितले. भाजपशी संलग्न असलेले राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की मराठा समाज हा थोरला, तर दलित समाज हा धाकटा भाऊ आहे. सर्वांना शांततेने एकत्र नांदावे, असे माझे आवाहन आहे. 

महाराष्ट्र सदनाबाहेर निदर्शने 
कोरेगाव भीमातील घटनेचे पडसाद दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनापर्यंत उमटले. काही कार्यकर्त्यांनी आज दुपारी सदनाबाहेर जोरदार निदर्शने केली. राज्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अतिसंवेदनशील भागातील महाराष्ट्र सदनाच्या परिसरात काल सायंकाळपासूनच सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Maharashtra Band Rajya Sabha