कुलभूषणमध्ये मी भाऊ सरबजितलाच पाहते... 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नवी दिल्ली : 'कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने खोट्या आरोपांखाली पकडले आहे, यात शंकाच नाही. त्या निष्पाप मुलाचाही ते नराधम किती छळ करत असतील हे देवच जाणे... कुलभूषणमध्ये मी माझा भाऊ सरबजितलाच पाहते. त्याच्या सुटकेसाठी मी वाहे गुरूंकडे रोज प्रार्थना करते...' पाकिस्तानने कपटाने ठार मारलेले भारतीय कैदी सरबजितसिंग यांच्या भगिनी दलबीर कौर यांनी 'सकाळ'शी बोलताना या भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्यांचे डोळे हे सारे बोलताना भरून आले होते... 

नवी दिल्ली : 'कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने खोट्या आरोपांखाली पकडले आहे, यात शंकाच नाही. त्या निष्पाप मुलाचाही ते नराधम किती छळ करत असतील हे देवच जाणे... कुलभूषणमध्ये मी माझा भाऊ सरबजितलाच पाहते. त्याच्या सुटकेसाठी मी वाहे गुरूंकडे रोज प्रार्थना करते...' पाकिस्तानने कपटाने ठार मारलेले भारतीय कैदी सरबजितसिंग यांच्या भगिनी दलबीर कौर यांनी 'सकाळ'शी बोलताना या भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्यांचे डोळे हे सारे बोलताना भरून आले होते... 

पाकिस्तान व इतर शत्रूंच्या भ्याड हल्ल्यांत किंवा त्यांच्या तावडीत सापडून हुतात्मा झालेल्या हजारो भारतीय शूरवीरांसाठी दिल्लीत राष्ट्रीय शहीद संग्रहालयाची स्थापना करावी, या मागणीसाठी दलबीर कौर यांनी हुतात्मा भगतसिंग यांचे चुलत पणतू यादवेंद्रसिंग यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली.

सरबजितप्रमाणेच पाकने अडकविलेल्या 300 हून जास्त कैद्यांची सुटका करावी, त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक हेळसांड थांबवावी आदी मागण्या त्यांनी केल्या. आठवले यांनी याबाबत गृहमंत्री राजनाथसिंह, सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा आदींना तत्काळ पत्रे लिहिण्याच्या सूचना केल्या. या वेळी झालेल्या चर्चेत कुलभूषण यांचा उल्लेख होताच दलबीर कौर यांचे डोळे आपला लाडका भाऊ सरबजितच्या आठवणींनी भरून आले.

त्या म्हणाल्या, की सरबजितलाही पाकिस्तानने 23 वर्षे विनाकारण तुरुंगात डांबले होते, त्याच्या सुटकेसाठीही खूप प्रयत्न झाले; पण अखेर त्याचा त्यांनी जीव घेतलाच. कुलभूषण यांनाही त्यांनी असेच डांबून ठेवले आहे. मी व सरबजित याच्या पत्नीने त्याची पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या काळ्या कोठडीत भेट घतेली, तेव्हा त्याने सांगितलेल्या त्याच्या भयानक छळाच्या आठवणींनी आजही मला रात्ररात्र झोप लागत नाही. कुलभूषण शूर आहेत, ते पाकिस्तानच्या दगाबाजीला पुरून उरतील. तेच काय; पण पाकच्या कैदेत वर्षानुवर्षे नरकयातना भोगणारे किमान 300 भारतीय भारतात सुखरूप परतावेत हीच प्रार्थना मी करत असते. 

कुलभूषण यांची आई व पत्नी या नुकत्याच त्यांना भेटून परतल्या आहेत. त्यांच्या धाडसाचे कौतुक करून दलबीर कौर म्हणाल्या, की तेथील अशा वेळचे आजूबाजूचे भयानक वातावरण मी स्वतः अनुभवले आहे, त्यामुळे या दोघींच्या साहसाचे कौतुक करावे लागेल. या दोघी म्हणजे देशाच्या सैनिकच आहेत. 

भगतसिंग अतिरेकी? 
क्रांतिकारकांचे मुकुटमणी हुतात्मा भगतसिंग यांचा उल्लेख अनेक पाठ्यपुस्तकांत व विद्यापीठांच्याही अभ्यासक्रमांत क्रांतिवादी किंवा अतिरेकी- दहशतवादी असा सर्रास केला जातो, तो तत्काळ वगळावा, अशीही मागणी दलबीर कौर यांनी केली. त्या म्हणाल्या, की ज्या भगतसिंग यांना पाकिस्ताननेही हुतात्म्याचा दर्जा दिला आहे, त्यांचा उल्लेख दिल्ली विद्यापीठासह आपल्याच देशातील अनेक पाठ्यपुस्तकांत व क्रमिक अभ्यासक्रमांत अतिरेकी असा व्हावा, हे दुःखदायक आहे. हा उल्लेख तत्काळ वगळावा.

Web Title: marathi news Kulbhushan Jadhav Pakistan India Sarabjit Singh