मोदींना अनुकूल; पण शहांना विरोध- ममता बॅनर्जी यांची भूमिका

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

विरोधक एकत्र येणार
सध्या देशामध्ये मोठी हुकूमशाही सुरू आहे, एखाद्या पक्षाचा अध्यक्ष मंत्र्यांची बैठक कशी काय घेऊ शकतो, पंतप्रधान मोदी आहेत की शहा, असा सवाल त्यांनी केला. भविष्यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर 2019 मध्ये नक्कीच बदल होईल. आम्ही बदलाची वाट पाहत आहोत. सध्या जरी कोणतीही आघाडी तयार झालेली नसली तरीसुद्धा विरोधकांनी एकत्र येऊन काम करायला सुरवात केली आहे. सहा महिने वाट पाहा सर्व चित्र स्पष्ट झालेले असेल, असेही त्यांनी नमूद केले.

कोलकता : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता पूर्वीच्या भूमिकेवरून "यू-टर्न' घेतला आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुकूल असल्याचे सांगत त्यांनी आपला मोर्चा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या दिशेने वळविला आहे.

"मी मोदी यांना अनुकूल आहे; पण अमित शहांना आपला विरोध कायम असेल. मी पंतप्रधानांवर आरोप केलेलाच नाही, मी त्यांच्यावर का आरोप करू, त्यांच्या पक्षानेच याची काळजी घ्यायला हवी," असे मत ममता यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडले. काही दिवसांपूर्वी ममता यांनी वस्तू व सेवाकर विधेयक आणि "जीएसटी'वरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला होता.

ममता यांच्या बोलण्याचा रोख या वेळी देशातील हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजकारणाच्या दिशेने होता. येथे एका पक्षाचा अध्यक्ष सरकारच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करताना दिसतो, असे त्यांनी सांगितले. या वेळी ममतांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले. वाजपेयी यांचे नेतृत्व संतुलित आणि सर्वांना न्याय देणारे होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना कधीच अडचणी आल्या नाहीत, असे सांगत त्यांनी सगळ्या समस्यांसाठी पंतप्रधान मोदी यांच्यामुळे निर्माण झालेल्या नाहीत, असे सांगत याला भाजपही कारणीभूत असल्याचे नमूद केले. मला पंतप्रधान मोदींवर आरोप करायचे नाहीत; पण त्यांच्या पक्षाने याची काळजी घ्यावी. त्यांचा पक्ष सर्वांसाठी का समस्या निर्माण करतो आहे, असा सवालही ममता यांनी केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: marathi news mamata banerjee narendra modi amit shah