गुरमीत राम रहीमचा 'डेरा' आता वीस वर्षे जेलमध्ये !

File photo of Gurmeet Ram Rahim Singh
File photo of Gurmeet Ram Rahim Singh

चंडीगड : साध्वींवरील बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला एकूण 20 वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. बलात्कारासंदर्भातील अन्य एका प्रकरणामध्येही राम रहीम याला आणखी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

या दोन्ही शिक्षा राम रहीम याला स्वतंत्रपने भोगावयाच्या आहेत. याचबरोबर, या प्रकरणी न्यायालयाने राम रहीम याला 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

तत्पूर्वी,  राम रहीम याला  तुरुंगातच स्थापन केलेल्या न्यायालय कक्षात आज (सोमवार) दहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. बाबा गुरमीतने न्यायालयात माफी देण्याची मागणी करत त्याला न्यायालयात रडू कोसळले.

गुरमीत राम रहीम समाजसेवक असून, त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. त्यांनी रक्तदान आणि स्वच्छता अभियान अशी समाजपयोगी कामे केली आहेत, असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. तर केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीवर राम रहीमकडून तीन वर्षे बलात्कार करण्यात आला. 45 अजून पीडित असून, त्या समोर आल्या नाहीत, असे सीबीआयने सांगितले होते. अखेर न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली.

डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत राम रहीमच्या समर्थकांकडून करण्यात येणारा संभाव्य हिंसाचार लक्षात घेता शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायालयाच्या न्यायधीशाची सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. गुरमीत राम रहीम सिंग याला शिक्षा सुनावण्यासाठी विशेष सीबीआय न्यायधीशास हवाई मार्गाने रोहतक जिल्हा तुरुंगात नेण्यात आले. या प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम याच तुरुंगात आहे. प्रशासनाने शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेची पूर्ण तयारी केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार, तुरुंगाबाहेर सुरक्षा दलाचे पाच कडे तयार केले. पंचकुला येथील घटनेनंतर प्रशासन कमालीची दक्षता बाळगून असून, गुरमीत राम रहीम याच्या समर्थकांना रोखण्यासाठी पुरेशी तयारी केली आहे. पोलिस अधीक्षक पंकज नैन म्हणाले, की रोहतक तुरुंग परिसरात चारही बाजूंनी पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जर कोणी जबरदस्तीने तुरुंगात घुसण्याचा प्रयत्न करेल, तर त्याला वेळीच पायबंद घालण्यात येणार आहे. 

रोहतकमध्ये जमावबंदी आदेश 
शहरात 144 कलम लागू केले आहे. याठिकाणी डेरा समर्थकांना येण्यास मनाई केली आहे. निमलष्करी दलाच्या वीस तुकड्यांसह हरियाना पोलिस तैनात केले आहेत. सध्या रोहतकमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राम रहीम याच्यावर कलम 376 (बलात्कार) आणि 506 (धमकावणे) यानुसार गुन्हा लावण्यात आला आहे. हे प्रकरण 2002 चे असून, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना एका साध्वीने लिहिलेल्या पत्रातून हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. 

हरियाना, पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद 
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर पंजाब आणि हरियानात मंगळवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर 72 तासांसाठी इंटरनेट बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. गुरमीत राम रहीम सिंगला दोषी ठरवल्यानंतर पंचकुला आणि सिरसा येथे उसळलेल्या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. दोन्ही राज्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. संवेदनशील भागांत संचारबंदी ठेवण्यात येणार आहे.

सुरक्षारक्षकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा 
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या सुरक्षा पथकातील सात जणांविरुद्ध पंचकुला पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पैकी पाच जण हरियाना पोलिसचे कर्मचारी आहेत. त्यातील तीन कमांडो आणि दोघे जॅमर वाहनाचे कर्मचारी होत. उर्वरित दोघे हे खासगी सुरक्षा एजन्सीचे कर्मचारी होते. त्यांच्याकडून शस्त्रेदेखील जप्त केली आहेत. पंचकुलाचे पोलिस आयुक्त ए. एस. चावला म्हणाले, की या सुरक्षारक्षकांनी कोर्ट कॉम्प्लेक्‍स परिसरात डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षांपासून झेड सुरक्षा पथकातील असून, कालांतराने ते डेरा सच्चा सौदाचे समर्थक बनले. 

डेरा सच्चा सौदाच्या संपत्तीची मोजदाद सुरू 
डेरा सच्चा सौदाच्या नाड्या प्रशासनाने आवळल्या असून, गुरमीत राम रहीम सिंगची मालमत्ता, संपत्ती तसेच बॅंक खात्याची माहिती गोळा केली जात आहे. पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने डेरा समर्थकांकडून झालेल्या नुकसानाची भरपाई डेरा प्रमुखाच्या संपत्तीतून करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानंतरच मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गुरमीत राम रहीम सिंगबद्दल आणखी वाचा

विश्लेषण:

कोण काय म्हणाले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com