काश्‍मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील काही भागांमध्ये काल रात्रीपासून लष्कराने शोधमोहीम हाती घेतली होती. या भागात तीन दहशतवादी दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीमध्ये 'हिज्बुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी ठार झाला. यासंदर्भात लष्कराने माहिती दिली आहे. या चकमकीदरम्यान आणखी एकाचाही मृत्यू झाला; मात्र तो इसम दहशतवादी आहे अथवा नाही, यासंदर्भात अधिक माहिती समजू शकलेली नाही. या चकमकीमध्ये 'राजस्थान रायफल्स'चा एक जवान जखमी झाला आहे. 

लष्कराबरोबर झालेल्या चकमकीमध्ये 'हिज्बुल'चा यावर निसार शेरगुजरी हा दहशतवादी ठार झाला. ठार झालेला दुसरा इसम त्या भागामध्ये दुचाकीवरून जात होता. दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये तो इसम सापडला. त्याच्यासंदर्भात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. 

संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील काही भागांमध्ये काल रात्रीपासून लष्कराने शोधमोहीम हाती घेतली होती. या भागात तीन दहशतवादी दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराच्या तुकडीवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. 

या गोळीबारामध्ये शेरगुजरी ठार झाला. पण इतर दोन दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. घटनास्थळी एक एसएलआर, दोन मॅगझिन्स, चाळीस काडतुसे आणि चिनी बनावटीचा एक बॉम्ब सापडला. 

Web Title: marathi news marathi website Kashmir News Kashmir Unrest Hizbul Mujahideen