पर्यायी इंधन वापरायला सुरवात करा; अन्यथा.. : नितीन गडकरी

पीटीआय
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

आता मी तुम्हाला (उत्पादक) पर्यायी इंधनाबाबत संशोधन करण्यासाठी नम्रतेने सांगत आहे. यापूर्वीही मी तुम्हाला इलेक्‍ट्रिक वाहनांसंदर्भात विनंती केली होती. 'अशा गाड्यांची बॅटरी महाग असेल' असे उत्तर तुम्ही त्यावेळी दिले. त्यावर मी तुम्हाला किमान सुरवात तरी करण्याचा आग्रह धरला. आता या बॅटरीची किंमत 40 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. त्यामुळे पर्यायी इंधनाबाबत तुम्ही आता सुरवात केली, तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना त्याचा खर्च भविष्यात कमी येईल.

नवी दिल्ली : 'प्रदूषणाला आळा घालायचा असेल, तर अपारंपरिक उर्जेचा पर्याय वापरलाच पाहिजे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो.. मी हे करणार आहे आणि ते करताना मी तुमची परवानगी घेत बसणार नाही.. हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील' अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना आज (गुरुवार) इशारा दिला. 

'प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करताना काही गोष्टी लादाव्या लागल्या, तरीही चालतील' असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. यामुळे वाहन उत्पादकांना यापुढे पर्यायी इंधनाकडे वळावे लागणार आहे. 

गडकरी म्हणाले, 'आता आपण पर्यायी इंधनाचा वापर केलाच पाहिजे. मी यासंदर्भातील निर्णय घेणार आहे आणि ते पाळावे लागतील. प्रदूषणाबाबत माझ्या कल्पना आणि धोरणे अगदी स्पष्ट आहेत. आयात कमी करणे आणि प्रदूषणाला आळा घालणे हे सरकारचे निर्विवाद धोरण आहे. हे धोरण जो कुणी पाळेल, त्याचा फायदा होईल. ज्याला हे धोरण मान्य नसेल, त्याने नंतर 'पारंपरिक इंधन वापरणाऱ्या वाहनांचे मोठे उत्पादन केले आहे' असे सांगत सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये.'' 

वीजेवर चालणाऱ्या वाहनांसंदर्भात केंद्र सरकार लवकरच धोरण जाहीर करेल, असे संकेतही गडकरी यांनी दिले. 'यापुढील भविष्य पेट्रोल किंवा डिझेलचे नसेल' असे सांगत गडकरी यांनी वाहन उत्पादकांना पर्यायी इंधनाकडे वळण्यासाठी संशोधन करण्यास सुरवात करण्याचा सल्लाही दिला. 'आता मी तुम्हाला (उत्पादक) पर्यायी इंधनाबाबत संशोधन करण्यासाठी नम्रतेने सांगत आहे. यापूर्वीही मी तुम्हाला इलेक्‍ट्रिक वाहनांसंदर्भात विनंती केली होती. 'अशा गाड्यांची बॅटरी महाग असेल' असे उत्तर तुम्ही त्यावेळी दिले. त्यावर मी तुम्हाला किमान सुरवात तरी करण्याचा आग्रह धरला. आता या बॅटरीची किंमत 40 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. त्यामुळे पर्यायी इंधनाबाबत तुम्ही आता सुरवात केली, तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना त्याचा खर्च भविष्यात कमी येईल. सुरवात करताना अडथळे हे सगळीकडेच असतात,'' असेही गडकरी म्हणाले. 

वीजेवर चालणारी वाहने, बस, टॅक्‍सी आणि दुचाकी हेच भविष्य आहे, यावर गडकरी यांनी जोर दिला आहे. 

Web Title: marathi news marathi websites Air Pollution Clean Vehicles Electric Vehicles Nitin Gadkari