वाराणसी : येथील हिंदू विद्यापीठातील हिंसाचाराचा तपास गुन्हा शाखेने सुरू केला असून, याप्रकरणी शिस्तपालन समितीच्या 20 सदस्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
यामध्ये माजी मुख्य शिस्तपालन अधिकाऱ्याचाही समावेश असून, या सर्वांना आपले जबाब नोंदविण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील आठवड्यामध्ये मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर विद्यापीठात हिंसक आंदोलन भडकले होते. या वेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामध्ये विद्यार्थिनींसह दोन पत्रकारही जखमी झाले होते.
गुन्हे शाखेचे महानिरीक्षक ग्यानेंद्र प्रसाद यांनी हिंसाचाराची चौकशी सुरू झाल्याचे सांगत सध्या आम्ही आम्ही विविध ठिकाणांवरील 'सीसीटीव्ही'चे फुटेज पडताळून पाहत आहोत, असे स्पष्ट केले. या दंगलीच्या चौकशीसाठी सायबर तज्ज्ञांच्या पथकाचीही मदत घेण्यात आली आहे.
या परिसरामध्ये दंगल उसळली तेव्हा डझनभरापेक्षाही अधिक मोबाईल ऍक्टिव्ह होते, या सर्वांवर आमची नजर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या दिवशी विद्यापीठामध्ये हिंसाचार झाला तेव्हा 20 शिस्तपालन अधिकारी सेवेवर होते. या सर्वांना नोटीस बजावत त्यांना लेखी अथवा तोंडी जबाब नोंदविण्यास सांगण्यात आले आहे.
माहिती गुप्त ठेवणार
हिंसाचार भडकाविण्यास कारणीभूत असणाऱ्यांची नावे दूरध्वनीवरून पोलिसांना कळविता येतील, याबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख आम्ही गुप्त ठेवू, असे गुन्हे शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील आणि बाहेरील समाजकंटकांची माहिती संकलित केली जात असून, मागील काही दिवसांत विद्यापीठास भेट देणाऱ्या अनोळखी माणसांवरदेखील पोलिसांचे लक्ष आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.