अमित शहांचे राज्यसभेत पदार्पण; पंतप्रधानांच्या रांगेत मिळाले स्थान! 

File photo of Amit Shah
File photo of Amit Shah

नवी दिल्ली : गेली तीन वर्षे सुरू असलेल्या भाजपच्या विजयी घोडदौडीचे शिल्पकार असलेले अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) संसदेत पदार्पण केले. गुजरातमधून अमित शहा राज्यसभेवर निवडून आले आहेत. अमित शहा यांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या रांगेत मानाचे स्थान मिळाले आहे. 

ऑगस्टमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अमित शहा खासदारपदी निवडून आले होते. संसदेतील हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच अमित शहा यांनी राज्यसभेत हजेरी लावली. सत्ताधारी पक्षाच्या पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची जागा आहे. यानंतर अमित शहा यांना जागा देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती निवड होण्यापूर्वी ही जागा वेंकय्या नायडू यांची होती. राज्यसभेत नव्याने दाखल झालेल्या सदस्यांची आसनव्यवस्था राज्यसभेच्या सचिवांतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे आता राज्यसभेमध्येही भाजपची ताकद वाढणार आहे. दुसरीकडे, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी आता सभागृहात नसतील. शिवाय संयुक्त जनता दलातून बाहेर पडलेले ज्येष्ठ खासदार शरद यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. 'विरोधी पक्षांचा आवाज दडपला जात आहे' असा आरोप करत बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जुलैमध्ये राज्यसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यसभेत या ताकदवान वक्‍त्यांची उणीव विरोधी पक्षांना भासणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com