गुजरातमध्ये काँग्रेसचे आत्मपरीक्षण सुरू 

File photo of Rahul Gandhi
File photo of Rahul Gandhi

मेहसाणा : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात सत्ताधारी भाजपची दमछाक करणारा काँग्रेस पक्ष आता आत्मपरीक्षणाच्या मोडमध्ये गेला असून, पक्षाच्या आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबिरामध्ये ताज्या निकालावर विचारमंथन केले जाईल. याच शिबिरात शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देखील सहभागी होणार आहेत. 

या शिबिरामध्ये जिल्हानिहाय निकालांवर चर्चा केली जाणार असून, लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या वाटचालीचा आराखडाही तयार करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचा सहकारी पक्ष असणाऱ्या भारतीय आदिवासी पक्षाला दोन जागा मिळाल्या असून, त्यांच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवानी हे वडगाममधून निवडून आले आहेत. हे चिंतन शिबिर दोन दिवस मेहसाणामध्ये चालणार असून, त्याचा समारोप अहमदाबादेत होईल. या वेळी राहुल गांधी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असेही सोळंकी यांनी नमूद केले. 

भाजपकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असून, निवडणूक आयोगाची भूमिकाही संशयास्पद आहे. पक्षाचा प्रचार आणि मिळालेल्या जागा पाहता आमची कामगिरी चांगलीच आहे. 
- अशोक गेहलोत, काँग्रेस सरचिटणीस 

राज्यात सोळा जागांवर काँग्रेसचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला असून, या जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही सरकार स्थापन करू शकलो असतो. 
- शक्तिसिंह गोहिल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 

गुजरात निवडणुकीच्या निकालांनी आमच्या पक्षाला जागे होण्याचा इशारा दिला असून, बूथ आणि अन्य पातळीवरील व्यवस्थापनामुळे कदाचित 
आमचा विजय झाला असेल. खऱ्या आणि वास्तववादी विकासाला पर्याय असू शकत नाही, याची जाणीव करून घेण्याची हीच वेळ आहे. भाजप जिंदाबाद! 

- शत्रुघ्न सिन्हा, भाजप नेते 

हार्दिकविरोधात 'एफआयआर' 
पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि त्यांच्या 50 सहकाऱ्यांविरोधात 11 डिसेंबर रोजी विनापरवाना शहराच्या बाहेर रोड शोचे आयोजन केल्याप्रकरणी 'एफआयआर' दाखल करण्यात आला आहे. अहमदाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका हार्दिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती बोपलचे पोलिस निरीक्षक आय. एच. गोहिल यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com