आठ टक्‍क्‍यांचा फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते..! : अमित शहा 

वृत्तसंस्था
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर शहा यांनी पक्षाच्या मुख्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 

नवी दिल्ली : 'गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आमच्या जागा कमी झाल्या आहेत हे मान्यच आहे; पण आम्हाला मिळालेल्या एकूण टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली आहे. मतांमधील आठ टक्‍क्‍यांहून जास्त फरक म्हणजे 'काँटे की टक्कर' नसते' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) व्यक्त केली. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर शहा यांनी पक्षाच्या मुख्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या जनतेचे आभार मानताना शहा यांनी काँग्रेसच्या प्रचाराच्या धोरणावर सडकून टीकाही केली. शहा म्हणाले, "जातीयवाद, वंशवाद आणि तुष्टीकरणाला भारतीय जनता नाकारत आहे, हे या निकालांमधून पुन्हा एकदा सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा आणि केंद्र सरकारच्या जनताभिमुख कारभाराचा हा विजय आहे. जातीयवाद, वंशवाद आणि मतपेढीचे राजकारण हे तीन घटक देशासाठी घातक आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेने या तीन घटकांना नाकारले आहे. मोदी यांच्या विकास यात्रेवर जनतेने विश्‍वास ठेवला आहे.'' 

'पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी लोकशाही कूस बदलत आहे. आता देशातील लोकशाही नव्या पर्वात प्रवेश करत आहे', असे विधानही शहा यांनी केले. 

'काँग्रेसने गुजरातमध्ये विखारी प्रचार करण्याचा प्रयत्न केला. जातीयवादाची पेरणी करण्याचा हा प्रयत्न गुजरातच्या जनतेने नाकारला, याचा आनंद आहे. गुजरातमधील काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते पराभूत झाले आहेत. जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने सवलतींच्या घोषणांचा पाऊस पाडला; तरीही जनता भाजपच्याच पाठीशी राहिली. प्रचारात काँग्रेसने भाषेची खालची पातळी गाठली. हा प्रयत्नही जनतेने नाकारला आहे', असे शहा म्हणाले. 

अमित शहा म्हणतात.. 

  • आजचा दिवस भाजपसाठी आनंदाचा! हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपच सत्ता स्थापन करणार आहे. 
  • हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या वेळी 38.47% मते मिळाली होती. आता यात दहा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. येथे आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे. 
  • 2014 मध्ये देशात 'एनडीए'चे सरकार स्थापन झाल्यानंतर देशभरात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपच्या जनाधारात वाढच झाली आहे. 
  • 2014 मध्ये देशात पाच राज्यांमध्ये भाजपचे सरकार होते आणि एका राज्यात 'एनडीए'चे सरकार होते. आता 14 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि पाच राज्यांमध्ये 'एनडीए'चे सरकार आहे. 
  • येत्या काही महिन्यांमध्ये चार राज्यांत निवडणूक होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचा विजय होईल.

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचे ई सकाळवरील कव्हरेज:

Web Title: marathi news marathi websites Gujarat Elections Narendra Modi Rahul Gandhi Gujarat Results Amit Shah BJP