नरेंद्र मोदी करणार सभांचे अर्धशतक 

नरेंद्र मोदी करणार सभांचे अर्धशतक 

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणविणाऱ्या भाजपला गुजरातमधील 22 वर्षांची सत्ता कायम राखण्यासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आधार उरल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीपर्यंत मोदी स्वराज्यात किमान 50 ते 60 विक्रमी सभा घेतील, असे सांगण्यात आले.

या आधी किमान दहा वेळा गुजरातचा दौरा करणाऱ्या मोदींचे 'मिशन गुजरात' सात नोव्हेंबरनंतर सुरू होईल, असे भाजप सूत्रांनी नमूद केले. 

भाजपने अहमदाबादजवळ अलीकडेच मॅरेथॉन बैठक घेऊन 182 उमेदवारांची यादी तयारी केली असून, प्रत्येकी तीन इच्छुकांची नावे अंतिम केली गेली आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा, भूपेंद्र यादव व भाजपचे भावी संघटनमंत्री व्ही. सतीश हे दिल्लीहून यासाठी हजर होते. मोदींनी बडोद्यातील एका सामान्य भाजप कार्यकर्त्याला दिवाळीला स्वतःहून दूरध्वनी केला. भाजपने 'ऑडिओ ब्रिज'' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली याची जाहिरात गुजरातेतील तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. आगामी काळात मोदी आणखी काही भाजप कार्यकर्त्यांशी असाच फोनसंवाद करणे शक्‍य आहे. 

दक्षिण गुजरात, कच्छ व मध्य गुजरातेत भाजपला प्रबळ आव्हान उभे राहिल्याने मोदींच्या सभांचा जोर त्या भागांत जास्त असेल. गुजरातची रणधुमाळी सुरू झाली तेव्हा मोदी त्या राज्यात 15 ते 17 सभा घेतील व हिमाचल प्रदेशात पाच ते सात सभा घेतील, असे भाजपने ठरविले होते. मात्र दिवसेंदिवस राज्यात भाजपसाठी वारे फिरू लागल्याचे फीडबॅक दिल्लीत येताच मोदींनी गुजरात निवडणुकीची सूत्रे स्वतःच्याच हाती घेतली आहेत. यात मोदींच्या मोठ्या व मध्यम सभांची एकूण संख्या 50 ते 60 च्याही पुढे जाण्याची चिन्हे आहेत. सोशल मीडिया टाउन हॉल व डिजिटल मीडियाच्या साहाय्यानेही मोदी काही सभांना संबोधित करू शकतात. 

काँग्रेस जातींच्या टेकूवर 
राज्यातील भाजपचे उमेदवार कधी जाहीर होणार, या प्रश्‍नावर दिल्लीच्या एका वरिष्ठ भाजप नेत्याने, 'गुजरातमधून अंतिम यादीच दिल्लीत येते व औपचारिकता पार पडल्यावर परत जाते, हा आमचा पूर्वानुभव आहे,' असा चिमटा काढला.

या नेत्याच्या म्हणण्यानुसार काँग्रेस या वेळेस जातींचा टेकू घेऊन लढत आहे व राष्ट्रीय पक्षाच्या भूमिकेला राहुल यांनी गुजरातेत तिलांजली दिली आहे. मात्र, हा खेळ काँग्रेसला महागात जाऊ शकतो. कारण गुजराती जनतेसमोर मोदी काळात झालेला विकास प्रत्यक्ष दिसत आहे. शिवाय राहुल यांचा हात धरला की काय होते, हे उमर अब्दुल्ला, अखिलेश यादव आदींच्या उदाहरणांनी सिद्ध झाले आहेच, असे तो म्हणाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com