स्पेक्‍ट्रम खटल्यात न्यायाधीश सात वर्षे पुराव्यांची वाट पाहत होते; पण.. 

पीटीआय
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : 'गेली सात वर्षं मी '2जी' खटल्यामध्ये एकतरी ठोस पुरावा समोर येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. पण सगळं व्यर्थच ठरलं!' अशा शब्दांत सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी नाराजी व्यक्त केली. बहुचर्चित 2-जी प्रकरणात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा, डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्यासह 17 आरोपींची सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) निर्दोष मुक्तता केली. 

हा निर्णय जाहीर करताना न्यायाधीश सैनी यांनी वरील टिप्पणी त्यात केली आहे. 'गेल्या सात वर्षांमध्ये सर्व कामकाजांच्या दिवशी मी प्रामाणिकपणे रोज सकाळी दहा ते पाच या कालावधीत न्यायालयात बसून राहिलो.. या प्रकरणात कुणीतरी कायद्याच्या कसोटीला पुरेपूर उतरणारा सज्जड पुरावा समोर ठेवेल, अशी माझी अपेक्षा होती.. पण हे सगळं व्यर्थच ठरलं!' अशी टिप्पणी न्यायाधीश सैनी यांनी 1,552 पानी निकालामध्ये केली आहे. 

कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील 'यूपीए' सरकारवर 2-जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारामुळे मोठा डाग लागला होता. यासंदर्भात देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. यावरून असंख्य अफवाही पसरल्या होत्या. या सर्वांची दखलही सैनी यांनी या निकालामध्ये घेतली आहे. 'अफवा, चर्चा आणि जनतेच्या मनातील शंका-कुशंकांना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये काहीही स्थान नसते', असे त्यांनी यात नमूद केले आहे. 

सीबीआयने या प्रकरणी ए. राजा आणि कनिमोळी यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्रुटी होत्या, असेही न्यायाधीश सैनी यांनी स्पष्ट केले. सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रामध्ये नाव घेतलेल्या एकाही आरोपीविरुद्ध ते पुरावे सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय घेताना अडचण आली नाही, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, 'या आरोपपत्रामध्ये नमूद केलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, असेही निदर्शनास आले आहे' असे ताशेरे न्यायाधीशांनी ओढले आहेत.

Web Title: marathi news marathi websites kanimozhi 2g spectrum case judgement